राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीतील कोट्यावधींचा भ्रष्टाचार आ.मंगेश चव्हाण यांनी केला उघड

 

चाळीसगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा तालुक्यातील असून सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. चाळीसगाव तालुका आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित प्रकल्प संचालकांकडून दुरुस्तीची माहिती घेतली असता कामाचा कालावधी उलटून गेला आहे. तरी अद्यापही काम पुर्ण न झाल्याचे आ. चव्हाण यांनी उघड केले आहे.

आज दि.३० सप्टेंबर २०२० रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, इंजि. हेमंत पाटील तसेच सबंधित विभागाचे अभियंता अग्रवाल यांच्यासोबत सुरु असलेल्या दुरुस्तीच्या बोढरे ते धुळे या एकूण ६२.८ कि.मी. कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्त्यावरील खड्डे न भरलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच आजूबाजूचे झाडे –झुडुपे काढण्याबाबत कोणत्याही प्रकारचे काम केलेले आढळले नाही. काही ठिकाणी भरलेले खड्डे हे आजच्या स्थितीला उखडलेले दिसले. निविदेतील मानंकनाप्रमाणे खड्डे भरणे अपेक्षित असताना झालेले काम देखील त्याप्रमाणे केलेले आढळले नाही. तसेच ज्या ठिकाणी रस्ता सुस्थितीत होता. त्याठिकाणचेच साखळी क्रमांक घेऊन चांगल्या रस्त्यावरच कारपेट केलेले आढळले. तसेच निविदेत साईडपट्ट्यांना मुरूम पसरवून त्यावर पाणी शिंपडून दबाई करणे, Road side furniture (दिशादर्शक सूचना फलक ई.) बसविणे आदी कोणत्याच प्रकारची कामे करण्यात आलेली नाहीत. या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर येथील प्रादेशिक अधिकारी यांना पत्र लिहून पुढील बाबींकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. 

1) निविदेप्रमाणे १९.७७ लक्ष रुपयांची BUSG चा ७५ मिमी चा खड्डे भरण्यासाठी थर करणे अपेक्षित असताना त्याएवजी थेट खडी व माती  टाकून खड्डे भरलेले आढळले, तसेच भरलेले खड्डे देखील कारपेट होण्याआधीच उखडलेले निदर्शनास आले.

2) निविदेप्रमाणे १८७.५० लक्ष च्या रकमेचे POT HOLES REPAIRS घेण्यात आलेले असून बाबीत नमूद केल्याप्रमाणे  दुरुस्ती करण्यासाठीचा खड्डा व्यवस्थित कोरून खाली TACKCOAT करून त्यावर ७५ मिमी  BM करणे असे असताना देखील याप्रमाणे खड्डे भरण्यात आलेले नाहीत.

3) निविदेप्रमाणे ७८.९४ लक्ष चे कारपेट व सीलकोट घेण्यात आलेले असून काही ठिकाणी वरील नमूद प्रमाणे दुरुस्ती न करता कारपेट केल्याचे दिसून आले. ही अतिशय अशोभनीय व गंभीर बाब आहे.

तरी यावरून असे निदर्शनास येते की, अंदाजपत्रक तयार करताना रस्त्याची परिस्थिती न बघता ठेकेदार यांच्या सोयीचेच काम घेण्यात आलेले आहे. पूर्ण रस्त्याच्या लांबीत व निविदेप्रमाणे फक्त २० टक्के काम केलेले आढळते व तेही निकृष्ठ दर्जाचे व मानांकनानुसार नसल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. तसेच या कामावर आजतागायत १ कोटी ३० लक्ष इतका खर्च झाल्याचे सांगण्यात आले. कार्यारंभ आदेशाप्रमाणे कामाची मुदत आजपासून केवळ २१ दिवसात म्हणजेच दि.२१ ऑक्टोबर २०२० रोजी संपणार असून नमूद दुरुस्ती कामाचा दोष देय कालावधी (Defect Liability Period) हा ६ महिन्याचा आहे हेही संबंधितांकडून सांगण्यात आले. मात्र सद्यस्थितीत केवळ २० टक्के काम झालेले आढळते. उर्वरित ८० टक्के काम हे कधीपर्यंत पूर्ण करण्यात येईल याबाबत साशंकता वाटते.

सदरचा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा असून अवजड वाहने त्यावरून जात असतात. लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी सबंधित अधिकारी यांना आजपर्यंत केलेल्या कामाची एमबी रेकोर्ड व कार्यारंभ आदेश प्रत मागितली असता ती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. यावरून निश्चितपणे यात भ्रष्टाचार झाल्याची शंका बळावते. काही ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे महामार्ग दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधींच्या निविदा काढल्या जातात व थातूर – मातुर काम करून हा निधी हडप केला जातो. मात्र ज्या जनतेच्या करातून हा पैसा उभा राहतो त्यांच्या नशिबी मात्र तोच खराब रस्ता व जीवघेणा प्रवास येतो. रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते. याबाबत तीव्र स्वरूपाचा असंतोष व नाराजी जनमानसात आहे.

म्हणूनच सदर कामाची व मी नमूद केलेल्या मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात येवून सबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व महाराष्ट्र शासन – सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय दि.३० जुलै २०२० नुसार सबंधित मुख्य मक्तेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच यात सहभागी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात यावी. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Protected Content