हे खरे दातृत्व : दिवंगत सहकार्‍याच्या कुटुंबाला आ. मंगेश चव्हाणांची १० लाखांची मदत !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या सहकारी पदाधिकार्‍याचा अकाली मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबियांना दहा लक्ष रूपयांची मदत करून, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतांनाच सर्व जबाबदार्‍या घेत असल्याची घोषणा आज आमदार मंगेश चव्हाण MLA Mangesh Chavan यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिलभाऊ नागरे यांचे अलीकडेच अकाली निधन झाल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकाच विचाराला प्रमाण मानून आगेकूच करणार्‍या अनिलभाऊंना आज सर्वपक्षीय आदरांजली अर्पण करण्यात आली. यात विविध पक्षांमधील त्यांच्या मित्रांनी भरभरून आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील अतिशय भावपूर्ण शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली. याप्रसंगी त्यांना गहिवरून आले.

या सर्वपक्षीय आदरांजली कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांनी दिवंगत अनिलभाऊ नागरे यांच्या कुटुंबाला वैयक्तीक दहा लक्ष रूपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबत त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलण्याची ग्वाही त्यांनी दिली. तर, या कुटुंबावर असणारे कर्ज आणि अन्य सर्व जबाबदार्‍या देखील आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

सगळेच नेते हे कार्यकर्ते आपला श्‍वास असल्याचे सांगतात, त्यांच्या अडी-अडचणीत उभे राहू अशी ग्वाही देतात. मात्र कुणाला काही झाले तर बहुतेक प्रसंगी नेते हात वर करत असल्याचे आपण सर्वांनी अनेकदा पाहिले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आपल्या निकटच्या सहकार्‍याच्या अकाली मृत्यूनंतर दहा लाखांच्या सहाय्यासह त्यांच्या सर्व जबाबदार्‍या उचलण्याची घोषणा करून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे. नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील नात्याचा हा विलक्षण भावबंध राजकारणासारख्या बदनाम मानल्या जाणार्‍या क्षेत्रातील एक अतिशय उजळ बाजू दर्शविणारा आहे. तर, आमदार मंगेश चव्हाण यांचे हे अजोड दातृत्व इतर नेत्यांनी अनुकरण करावे असेच ठरले आहे.

खालील व्हिडीओत पहा आमदार मंगेशदादा चव्हाण यांची सर्वपक्षीय शोकसभेतील भावनांनी ओथंबलेली सहवेदना !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1028678241356933

Protected Content