



वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये UPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना प्रशासकीय सेवांकडे वळविण्याच्या उद्देशाने अलफैज फाउंडेशनच्या ‘मिशन UPSC’ उपक्रमांतर्गत वरणगाव येथील फखरुद्दीन अली अहमद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि प्रशासकीय सेवांमधील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन मोहतर्म जमील टेलर होते. शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अलाउद्दीन सेठ मजीद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनीच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर अब्दुल कय्यूम शाह यांनी ‘मिशन UPSC’ उपक्रमाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे महत्त्व याबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. इक़रा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केवळ मोठ्या शहरातील किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांसाठी नसून ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीही योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या परीक्षा उत्तीर्ण करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला अडथळा न मानता मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी, असे आवाहन डॉ. सालार यांनी केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी न करता देश, समाज आणि संविधान यांची सखोल समज विकसित करण्याच्या दृष्टीने करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. आई-वडिलांचे कष्ट आणि त्यांनी पाहिलेली स्वप्ने लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्य या गुणांच्या बळावर यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. IAS, IPS तसेच इतर उच्च प्रशासकीय पदांवर जाऊन समाज आणि देशासाठी योगदान देण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या मुस्लिम समाजातील विविध यशस्वी उमेदवारांच्या संघर्षकथा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनेकांनी मिळविलेले यश हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
UPSC परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच वाचनाची सवय लावून घ्यावी, वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करावा, तसेच लेखन कौशल्य आणि वेळेचे नियोजन यावर भर द्यावा, असे डॉ. वकार शेख यांनी सांगितले. यावेळी हारून सर यांनी ‘Mission UPSC Version 2’ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. UPSC परीक्षेचे विविध टप्पे, अभ्यासक्रम, विषयांची निवड, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लवकर सुरुवात करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात जमील टेलर यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे अलाउद्दीन सेठ मजीद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षण आणि मेहनतीच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शफी सर यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांबाबत उत्स्फूर्तपणे माहिती घेतली.



