महागाडे किंमतीचे आयफोन लांबविणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत २ लाख रुपये किमतीचे तीन आयफोन आणि वन प्लस मोबाईल हस्तगत केले आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

नशेमन कॉलनी, के.जी.एन. डेअरी जवळ राहणारे तन्वीर मजहर पटेल यांच्या घरात १८ मे पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घराचा बंद दरवाजा उघडून घरात प्रवेश करत २ अॅपल कंपनीचे आयफोन आणि १ वन प्लस कंपनीचा मोबाईल असे एकूण २ लाख रुपये किमतीचे फोन चोरून नेले होते. या प्रकरणी तन्वीर पटेल यांच्या फिर्यादीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने घटनास्थळाजवळील नागरिकांची चौकशी केली, गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना गुन्ह्याच्या वेळी फिर्यादीच्या घराजवळ एक अल्पवयीन मुलगा फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने शहरातील वेगवेगळ्या परिसरात शोध घेऊन त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले २ अॅपल कंपनीचे आयफोन आणि १ वन प्लस कंपनीचा मोबाईल असे २ लाख रुपये किमतीचे सर्व मोबाईल फोन २४ तासांच्या आत हस्तगत करत गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.