पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या ‘अमृत भारत स्टेशन’चे लोकार्पण; सावदा रेल्वे स्टेशनचाही समावेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने भारतीय रेल्वेच्या सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली असून, महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या १ लाख ५५ हजार ८७४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात राज्याला २३ हजार ७७८ कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून राज्याच्या रेल्वे विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाची रूपरेषा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना अद्ययावत सुविधा मिळतील.

पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून देशभरातील रेल्वे प्रकल्प वेगाने मार्गी लागत आहेत. रेल्वे स्थानके, गाड्या, ट्रॅक आणि सिग्नलिंग व्यवस्था यांना जागतिक दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २०२३-२४ मध्ये पंतप्रधानांनी देशभरातील १००० हून अधिक स्थानकांचे भूमिपूजन केले होते.

याच विकासाच्या पुढच्या टप्प्यात, २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत देशातील १०३ स्थानकांचे लोकार्पण/समर्पण होणार आहे. यात महाराष्ट्रातील १५ स्थानकांचा समावेश आहे, ज्यात लासलगाव, परळ, मुर्तिजापूर जंक्शन, चंदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, आमगाव, केडगाव, देवळाली, धुळे, सावदा, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शाहाड आणि लोणंद या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्थानकावर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या रेल्वे स्थानकांचा विकास स्थानिक प्रवाशांनाच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांनाही आधुनिक, सुरक्षित आणि सुविधा संपन्न सेवा देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. रेल्वेच्या या विकासात्मक वाटचालीमुळे राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीलाही हातभार लागणार आहे.

Protected Content