अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने शेतकरी बांधवाना मोठा न्याय मिळाला असून यामुळे जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील शेतकर्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळणार आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीने दिल्ली येथील तांत्रिक सल्लागार समिती कडे केलेले अपील मागे घेतल्याने शेतकर्यांच्या खात्यावर पीक विम्याची अग्रीम रक्कम जमा झाली आहे. जळगाव जिल्ह्यात ७२ कोटी तर अमळनेर तालुक्यात ३६ कोटी रुपये ४७ हजार शेतकर्यांना ही रक्कम मिळणार आहे.
पावसाचा सतत ४२ दिवसांचा पडलेला खंड आणि पैसेवारी पन्नास पैशाच्या आत असल्याने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर ,चाळीसगाव ,धरणगाव आणि रावेर तालुक्यातील काही शेतकरी यांच्या कापूस पिकासाठी मिड सिझन पीक विम्याची अग्रीम रक्कम २५ टक्के मंजूर झाली होती. ही रक्कम जळगाव जिल्ह्यासाठी ७२ कोटी व अमळनेर तालुक्यासाठी ३६ कोटी होती. मात्र पीक विमा मंजूर झाल्यावरही उडीद ,मुग ,मका पिकाची साडे चार कोटी रक्कम देऊन ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीने जिल्हाधिकार्यांकडे अपील केले होते.
जिल्हाधिकार्यांकडे अपील फेटाळल्यावर कंपनीने नाशिक आयुक्तांकडे अपील करून खोटी माहिती सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सुरवातीपासून अनेक स्तरावर पाठपुरावा केला. या संदर्भात कृषी विभाग आणि विमा अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी, कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे व शेवटी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्याकडेही बैठक लावली. या संदर्भात काही विमा कंपन्या केंद्राकडेही गेल्या होत्या. अखेर राज्य शासनाने शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ज्ञांचा अहवाल तपासून विमा कंपनीचे अपील फेटाळले. मात्र तरीही ओरिएंटल इन्श्युरांस कंपनी केंद्राकडे गेल्याचे सांगून शेतकर्यांना विमा द्यायला तयार नव्हती.मात्र मंत्री अनिल पाटील यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने कंपनीने दिल्ली येथील सर्व अपील मागे घेत शेतकर्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा केली आहे. शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंद पसरला आहे.
या संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील म्हणाले की, यात शेतकरी बांधवाना न्याय मिळाला हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे असून गेल्या अनेक दिवसांपासून करीत असलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.शेतकरी राजा जगला पाहिजे हेच धोरण शेतकरी पुत्र म्हणून माझे कायम राहणार आहे.