मध्यमवर्ग हीच भारताची खरी सॉफ्ट पॉवर बँक ! ( ब्लॉग )

( प्रतिकात्मक छायाचित्र – आंतरजालावरून साभार )

सध्या सुरू असणार्‍या भारत-पाकमधील तणावाच्या पार्श्‍वभूमिवर, आजच्या जगात युध्दाचा उन्माद हा विनाशाकडे कसा घेऊन जातो याबाबत अतिशय संतुलीत पध्दतीत शैलेंद्र कवाडे यांनी केलेले हे विवेचन खास आपल्यासाठी सादर करत आहोत.

आजच्या काळात एखाद्या राष्ट्राकडे असलेली अण्वस्त्रे म्हणजे कपाटात ठेवलेल्या जुन्या विरलेल्या पैठणीसारखी आहेत. तुमच्या कपाटातील विटकी पैठणी तुम्हांला निव्वळ समाधान देते, तुम्ही ती वापरू शकतं नाही. अण्वस्त्र वापरावी असा प्रसंग जग येऊ देत नाही. जगाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती आहे.

ज्या एकमेव देशाने अण्वस्त्रे बनवली आणि वापरली, तो आजही त्याबद्दल खजील होतो. अमेरिकेचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जपानला गेला की हिरोशिमा आणि नागासकीला जाऊन श्रद्धांजली वाहतो. ज्या एकमेव देशाने आण्विक हल्ला सहन केला त्याने कधीही सूड म्हणून अण्वस्त्रे बनवली नाहीत.

अण्वस्त्रे तुमच्या देशाचे बाह्य किंवा अंतर्गत प्रश्न सोडवू शकत नाहीत. जगातील सर्वाधिक अण्वस्त्र असलेला USSR भुकेमुळे फुटला. अण्वस्त्र पोट भरू शकत नाही. त्या काळात जगाचा रस फक्त ती अण्वस्त्रे चुकीच्या अनियंत्रित हातात जाऊ नयेत इतकाच होता. पाकिस्तानमध्येही जगाचा रस तितकाच आहे.

अण्वस्त्रे तुमच्या संरक्षणाची हमी देत नाहीत. राष्ट्र म्हणून तुमची प्रतिमा, तुमचा व्यापार, इतरांचे तुमच्या देशाशी असलेले, गुंतलेले हितसंबंध, जागतिक समुदायाच्या मनात तुमच्याबद्दल असलेली विश्वासहर्ता हेच तुमचे संरक्षक कवच असते. तुमची उज्वल प्रतिमा आणि जगाचे हितसंबंध हे जवळजवळ जगाचे सैनिकीबळ तुमचेच असण्याइतके परिणामकारक असतात. ह्या सगळ्याला मिळून सॉफ्ट पॉवर म्हणतात. आजच्या आंतरराष्ट्रीय संबंधात सॉफ्ट पॉवर सगळ्यात महत्त्वाची समजली जाते.

व्यापारी नीती ही आजच्या जगातील सर्वोत्तम नीती आहे. इतकं सगळं होऊनही चीनने भारताला साधी शाब्दिक धमकीही दिली नाही. ज्या देशाशी तुम्ही 100 बिलियन डॉलरचा व्यापार करताय त्याला दुसऱ्या देशासाठी कोणी दुखावत नसतो.

ह्या व्यापाराची अजून एक गंमत आहे. इथला पैसा कोणत्याच तिजोरीत बंद नाही. उद्या एखाद्या देशाने अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली जिंकली तरी त्याच्या हाती लाखो कॉम्प्युटर आणि चकचकीत ऑफिसेस सोडून इतर काहीही लागणार नाही. सुरतेची लूट करून संपत्ती मिळायची पण वर्ल्ड ट्रेंड सेंटर पाडलेल्या अतिरेकी संघटनेला फुटका रुपयाही मिळाला नाही. जगाचा पैसा आता लोकांच्या डोक्यात आहे. जगाची संपत्ती आता पूर्णपणे कल्पनेत आणि एकमेकांवरच्या विश्वासात गोठलेली आहे.

भारताचे सर्वोत्तम शस्त्र भारताचा मध्यमवर्ग आहे. जगातल्या उत्कृष्ट वस्तू वापरायची इच्छा असलेला, त्यासाठी जीवापाड मेहनत करणारा, जागतिक मूल्यांचा सन्मान करणारा, मानवतेवर आणि मानवी नैतिकतेवर विश्वास असलेला स्वागतशील, प्रगतिशील मध्यममार्गी मध्यमवर्गीय समाज हीच भारताची सॉफ्ट पॉवर बँक आहे.

ह्या सत्तर ऐंशी कोटी लोकांमध्ये कुणाला बाजारपेठ दिसते, कुणाला कर्मचारी दिसतात, कुणाला ज्यांच्याशी सहज नाते जोडता येईल असा मानवी समूह दिसतो.

आजचे जग आकुंचित व्हायला बघतेय. भाषेच्या, प्रांतांच्या, राष्ट्राच्या सीमा ओलांडून जग एकमेकांच्या हातात हात घेऊन वाटचाल करायला बघतेय. ह्याच साधं कारण म्हणजे जगाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या जगातील कोणताच समुदाय एकट्याच्या जीवावर सोडवू शकत नाही. प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, नवनविन विषाणू, आटत चाललेले पाणी हे जागतिक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरही जागतिकच आहेत. कोणतेही राष्ट्र एकट्याने हे प्रश्न सोडवू शकत नाही.

आजवर जेंव्हा दोन राष्ट्र एकमेकांशी संबंध जोडायचे तेंव्हा दोन राष्ट्रांचे सरकार एकमेकांच्या संपर्कात यायचे. आज जग लहान झालंय. सोशल नेटवर्कवरून लोकं एकमेकांशी संबंध ठेवतात. एकाच बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारे लोकं एकमेकांशी बोलतात. आपण नकळत आपल्या राष्ट्राची प्रतिमा तयार करत असतो. आपण आपल्या राष्ट्राचा, आपल्या समाजाचा चेहरा असतो.

हा चेहरा नीटनेटका असावा, त्यावर अतिरेकी भावनांचे आणि आक्रमकतेचे गळू नसावेत, आपल्या तोंडी जागतिक मूल्यव्यवस्थेच्या विपरीत भाषा नसावी ह्यासाठी खरंतर वेगळे प्रयत्न करण्याची गरज पडू नये. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्यक्तित्वातच भिनवुन घ्यायला हव्यात, म्हणजे जेंव्हा एखाद आव्हान समोर उभं राहतं तेंव्हा स्वतःच हसू होत नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतीय मीडियाने भारतीय समाजाचं एक हास्यास्पद चित्र जगापुढे उभं केलंय. आपणही आपल्या वागण्याने त्याला जरासा हातभार लावलाच. शेवटी ह्या मीडियात काम करणारे लोकही अपल्यातलेच आहेत.

भारतीय मध्यमवर्ग हा जागतिक स्तरावर एक सुज्ञ, प्रगतिशील, पुरोगामी वर्ग समजला जातो. जगभरात राहणाऱ्या आणि फिरणाऱ्या भारतीयांनी ही प्रतिमा तयार केली आहे. ही प्रतिमा म्हणजे भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. जेंव्हा आपल्यातीलच काही लोकं, स्वतःच्या मूर्ख स्वार्थासाठी ह्या संपत्तीची नासधूस करतात तेंव्हा ती थांबवणे हीदेखील आपलीच जबाबदारी असते. आपण त्या नासधूसीत सामील न होणे म्हणूनच फार आवश्यक आहे.

आपल्या सर्वोत्तम शस्त्राची धार बोथट करणे आपल्याला परवडणार नाही.

शैलेंद्र कवाडे

Add Comment

Protected Content