धरणगावातील उपजिल्हा रूग्णालयाचा मार्ग होणार मोकळा : कामाला येणार गती

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | धरणगावकरांच प्रदीर्घ काळापासून असलेली उपजिल्हा रूग्णालयाची मागणी आता पूर्णत्वाकडे येणार असल्याची घोषणा आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

या नियोजीत रूग्णालयासाठी बालकवि ठोंबरे यांच्या स्मारकाच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आली असून येथे मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धरणगावात आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. तसेच याप्रसंगी ना. पाटील यांनी विविध खात्यांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना अचूक नियोजन करून कार्यान्वयनाचे निर्देश दिलेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगावच्या तहसील कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी महसूल, सार्वजनीक बांधकाम, नगरपालिका, भूमि अभिलेख, कृषी, पशुसंवर्धन, महावितरण आदी खात्यांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले. यात त्यांनी प्रशासनातर्फे विविध योजनांच्या कार्यान्वयनाबाबत माहिती दिली.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आजपासून सुरू झालेल्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. या पंधरवड्यात १७ सप्टेंबर ते २ऑक्टोंबर पर्यंत विविध १४ सेवांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. यात अतिवृष्टीग्रस्तांना नवीन निकषानुसार मदत, पीएम. सन्मान योजनेच्या निधीचा लाभ; फेरफार नोंदीचा निपटारा, शिधापत्रिका वाटप, विवाह नोंदणी प्रमाणपत्र वाटप, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी, प्रलंबीत विद्युत जोडणी, विद्युत मीटर हस्तांतरणात नाव जोडणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ; वनहक्क पट्टे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांच्या वाटपाचा समावेश असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

या बैठकीत धरणगाव शहरासाठी आवश्यक असणार्‍या उपजिल्हा रूग्णालयाबाबत चर्चा करण्यात आली. ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: यासाठी पाठपुरावा केला आहे. याबाबत २०२१ साली प्रस्ताव देखील पाठविण्यात आलेला असला तरी जागेअभावी हा प्रस्ताव अडकून पडला होता. यामुळे शहरातील उपलब्ध जागांपैकी बालकवि स्मारकाच्या लगतच्या बाजूच्या पाच एकर जागेत उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात यावे असा निर्णय याप्रसंगी घेण्यात आले.

या जागेची अधिकार्‍यांनी तातडीने पाहणी करण्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिल्यावर संबंधित अधिकारी यांनी जागेची पाहणी केली. यामुळे लवकरच उपजिल्हा रूग्णालयाचा मंजुरीचा प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव जिल्हा दौर्याप्रसंगीमार्गी मांडणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथे आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आता उपजिल्हा रूग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग हा खर्‍या अर्थाने मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बैठकीत सध्या सुरू असलेल्या लंपी आजाराच्या संसर्गाबाबत चर्चा करण्यात आली. यात एलडीओ आणि एलएसएस या अधिकार्‍यांच्या मार्फत आढावा घेण्यात आला. यात तालुक्यातील ९० टक्के गुरांचे लसीकरण झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी उर्वरित १० टक्के गुरांचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जिल्हा नियोजनच्या निधीतून चार कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पशुवैद्यकीय रूग्णालयाचे काम देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

धरणगाव शहरातील पोलीस वसाहतीतील घरांची दुर्दशा झाली असून येथे नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ना. गुलाबराव पाटील यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना दिलेत. तर, याच खात्यातर्फे अतिशय सुसज्ज असे ११ कोटी रूपयांच्या रेस्ट हाऊसच्या कामाला मंजुरी मिळणार असून याचे काम देखील लकवरच सुरू होणार असल्याची माहिती याप्रसंगी अधिकार्‍यांनी दिली. तसेच याच कार्यक्रमात नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रूपयांच्या अनुदानाचे पत्र ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसीलदार सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.जी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, सार्वजनीक बांधकाम खात्याचे उप अभियंता सी. डी. पाटील, शाखा अभियंता ए. टी माळी; एस.ए. सपकाळे, डॉ. मयूर जोशी, डॉ. एस.डी भालेराव, ग्रामीण पुाणी पुरवठा विभागाचे सुनील बोरकर, भूमि अभिलेखचे उपनिबंधक विजयकुमार देवरे, डी.एस. दुसाने, महावितरणचे सुनील रेवतकर, मनीष धोटे, तालुका कृषी के.एस. देसले, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, माजी नगरपालिका गटनेते पप्पू भावे, कैलास महाजन, भगवान महाजन, विजय महाजन, भाजपचे ऍड. संजय महाजन, कैलास माळी आसीफ पटेल, रवी कंखरे, महेश पाटील, प्रशांत देशमुख, फारूक पटेल आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जनार्दन पवार यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार श्री सातपुते यांनी मानले.

Protected Content