धरणगाव प्रतिनिधी । आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झालेली आहे. यामुळे शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते येथील राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजीत मानसिक आरोग्य शिबिरात बोलत होते.
धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात आज राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजीत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हिल सर्जन एन. एस. चव्हाण होते. प्रास्ताविकातून मनोविकार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे-पाटील यांनी तणावमुक्तीबाबतची माहिती दिली.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ही बाब काळाची गरज आहे. प्रांताधिकारी व तहसीलदारांनी या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुकोदगार काढले. ना. पाटील पुढे म्हणाले की, कोविडचा कालखंड हा अतिशय खडतर होता. यात आरोग्य सेवकापासून ते वैद्यकीय व प्रशासनकीय अधिकारी व कर्मचार्यांनी अतिशय चांगले काम केले. कोविडच्या आपत्तीतील जवळपास निम्म्या व्याधी या मनाशी संबंधीत होत्या. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झालेली आहे. यामुळे शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे. मनोविकारग्रस्तांना आधार देण्याचे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, प्रभारी नगराध्यक्ष सौ. कल्पना महाजन, पं. स. सभापती मुकुंदराव नन्नावरे, जि. प . सदस्य गोपाल चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितींकुमार देवरे पी.एम. पाटील सर , राजेंद्र महाजन, भानुदास विसावे , भगवान महाजन , निलेश चौधरी यांच्यासह अनेक डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव गोसावी यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी मानले.