महाराष्ट्रातील पुरुष महिलांपेक्षा जास्त तणावात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात पुरुषांच्या मानसिक आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. स्वतःच्या भावना व्यक्त न करणाऱ्या आणि मनातील घालमेल कोणासमोर न सांगणाऱ्या पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या तुलनेत पुरुषांकडून टेलिमानस हेल्पलाईनवर दुप्पट कॉल केल्याचे समोर आले आहे.

आरोग्य विभागाच्या टेलिमानस हेल्पलाईनवरून मिळालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी येणाऱ्या एकूण कॉलपैकी ६७.९९ टक्के कॉल पुरुषांकडून तर ३१.५० टक्के कॉल महिलांकडून आले आहेत. विशेष म्हणजे, ०.०१२ टक्के कॉल पारलिंगी व्यक्तींनी केले आहेत. यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील ७१ टक्के तर ४६ ते ६४ वयोगटातील १६.४ टक्के नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे.

पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढण्यामागे मुख्यतः कामाच्या ठिकाणी वाढलेला ताण, नातेसंबंधातील तणाव आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केली जाणे ही कारणे आहेत. टेलिमानस हेल्पलाईनवर आलेल्या कॉल्समधून चिंता, तणाव, झोपेच्या समस्या, अस्वस्थता, एकटेपणा आणि व्यसनाधीनता यासंबंधी सर्वाधिक विचारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नैराश्य आणि मानसिक तणावाबाबत सल्ला घेण्यासाठी सर्वाधिक कॉल कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहेत. त्यानंतर पुणे शहराचा क्रमांक लागत असून मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. यावरून मोठ्या शहरांमध्येही मानसिक आरोग्याच्या समस्या गंभीर बनत असल्याचे चित्र स्पष्ट होते.

राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४५ हजार ४३१ कॉल्स टेलिमानस हेल्पलाईनवर आले आहेत. यातील ८५ हजार ६५० कॉल्समधून मानसिक आरोग्याबाबत सल्ला घेण्यात आला आहे. तर, आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठी ०.९७३ टक्के नागरिकांनी संपर्क साधला आहे. पुरुषांनी आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि गरज असल्यास मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. समाजानेही पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा समजून घेत सकारात्मक संवाद वाढवण्याची गरज आहे.

Protected Content