धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील जिजाबाई शंकर पाटील यांचे पक्के घरकुल साकार झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 2 जानेवारी 2024 रोजी गावाला भेट देऊन लाभार्थ्याच्या घरकुलासाठी आश्वासन दिले होते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी तातडीने कार्यवाही करत मोदी आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केले. आर्थिक सहाय्य वेळेत उपलब्ध करून दिल्याने घरकुलाचे काम वेगाने पूर्ण झाले. जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली घरकुल योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे.
जिजाबाई पाटील यांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानत, “जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण झाले आणि आम्हाला हक्काचे घर मिळाले,” असे सांगितले. स्थानिक प्रशासनाच्या प्रभावी कार्यामुळे अनेक गरजू नागरिकांना पक्की घरे मिळत आहेत. मुसळी गावात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील इतर पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.