धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहकार क्षेत्रात पारदर्शक आणि शिस्तबद्ध कामासाठी ओळखले जाणारे भुसावळ येथील प्रमाणित लेखापरीक्षक प्रकाश प्रल्हाद चौधरी यांना महाराष्ट्र राज्याचा ‘प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आळंदी येथे पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल धरणगाव येथील ‘यशवंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आळंदीत पार पडले ऐतिहासिक अधिवेशन :
पुणे येथील ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने २१ व २२ मार्च २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे ‘प्रमाणित लेखापरीक्षक राज्यस्तरीय अधिवेशन व कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या दोन दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधून शेकडो लेखापरीक्षक सहभागी झाले होते. या ऐतिहासिक अधिवेशनात श्री. चौधरी यांच्या लेखापरीक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यशवंत अर्बन सोसायटीतर्फे यथोचित सत्कार :
प्रकाश चौधरी यांच्या या राज्यस्तरीय यशाची दखल घेत, धरणगाव येथील यशवंत अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन सम्राट परिहार आणि मॅनेजर किरण मराठे यांनी चौधरी साहेबांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान केला. यावेळी पी. पी. चौधरी साहेबांचे सहाय्यक दिलीप सोनार (जळगाव) आणि संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील लेखापरीक्षकांसाठी हा प्रेरणादायी क्षण – प्रकाश चौधरी
सत्काराला उत्तर देताना श्री. प्रकाश चौधरी भावूक झाले. ते म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा नसून जळगाव जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था आणि लेखापरीक्षकांचा आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक पारदर्शकतेने आणि जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.” यावेळी त्यांनी यशवंत अर्बन संस्थेचे चेअरमन सम्राट परिहार, व्हाईस चेअरमन सी. के. आबा, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.



