सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हजारो अनाथ व निराधार मुलांना आईच्या मायेचे छत्र देणाऱ्या आणि ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचे फैजपूर शहराशी असलेले अतूट नाते आणि भावनिक ऋणानुबंध फैजपूरकर कधीही विसरणार नाहीत, असे भावपूर्ण उद्गार सहकार भारतीचे जळगाव जिल्हाध्यक्ष व सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी व्यक्त केले.
नुकतेच नरेंद्र नारखेडे यांनी शिरूर (जि. पुणे) येथील सिंधुताईंच्या “ग्लोबल मदर फाऊंडेशन” या अनाथ आश्रमाला भेट दिली. तेथील निराधार मुलांशी संवाद साधताना ते बोलत होते. सिंधुताईंनी आपल्या जीवनात सुमारे २१०० मुलामुलींचे मातृत्व स्वीकारून त्यांचे यशस्वी संगोपन आणि शिक्षण पूर्ण केले. इतकेच नव्हे, तर त्यांनी ३०० हून अधिक मुलींचे विवाहसोहळे आयोजित केले आणि ४०० गायींचा सांभाळ करत एक अद्वितीय समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे, त्यांनी हे सर्व कार्य कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय, केवळ समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने चालवले.
आता संस्थेतील मुलांची वाढती संख्या लक्षात घेता, शिरूर येथे नवीन शाखेची उभारणी केली जात आहे. यासाठी सोलापूर येथील वासुदेव व्हटकर यांनी उदार मनाने १५ हजार चौरस फूट जागा दान केली आहे. या जागेवर ३०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आधुनिक वसतिगृह साकारले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी फैजपूर शहराच्या वतीने आर्थिक मदतीचे आश्वासन नरेंद्र नारखेडे यांनी दिले आहे.
या भेटीदरम्यान, संस्थेचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात फैजपूरकर नागरिकांनी केलेल्या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सातपुडा अर्बन सोसायटी, श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, देविदास टिकाराम चौधरी पतसंस्था आणि नरेंद्र नारखेडे मित्रमंडळ यांच्या मोलाच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांचे समाजसेवेचे कार्य ममता ताई सपकाळ व विनय सपकाळ हे समर्थपणे पुढे नेत आहेत, याचा आनंद नारखेडे यांनी व्यक्त केला. त्यांनी वसतिगृहातील निराधार मुलांशी मनमोकळी बातचीत केली आणि त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात संस्थेचे व्यवस्थापक सचिन ढोरमले, अधीक्षक मीनाक्षी लतांबळे, सहव्यवस्थापक पायल तायडे, भाऊसाहेब मांडले, दत्ता जाधव, अक्षय खरमाळे आणि अध्यक्ष विनय सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, पुणे येथील विशाल सुभाष इंगळे यांचेही स्वागत करण्यात आले.