कोरपावली येथील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त एका प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच विलास अडकमोल आणि यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

कोरपावलीचे सरपंच विलास नारायण अडकमोल आणि गोविंद बहुउद्देशीय संस्था, कोरपावली तालुका यावल या समाजसेवी संस्थेने संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष नारायण अडकमोल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उपयुक्त पुस्तके वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे, गावातील सामाजिक कार्यकर्ते मुक्तार पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने कोरपावलीत सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र दिसून आले. गोविंद बहुउद्देशीय संस्था आणि सरपंच विलास अडकमोल यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीत विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे दालन उघडणाऱ्या या कार्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content