यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांचा ‘खान्देश आयकॉन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सप्तरंग मराठी चॅनलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मराठी मालिकांचे लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुमामा भोळे, डॉ. अर्चना सुर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिक्षण, कला, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव केला जातो. याच मालिकेत यावल तालुक्यातील कोरपावली येथील युवा नेतृत्व राकेश वसंत फेगडे यांना २०२५ या वर्षाचा ‘खान्देश आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राकेश फेगडे यांनी आपल्या कार्याद्वारे समाज आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे रावेर-यावलचे लोकप्रिय आमदार अमोल हरिभाऊ जावळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, उमेश फेगडे, सागर कोळी, उमेश बेंडाळे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू जर्नादन कोळी, बाजार समितीचे सर्व संचालक, कोरपावली विकास सोसायटीचे सर्व संचालक आणि कोरपावली गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन आणि स्वागत केले आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक ऊर्जा मिळाली असून, ते यापुढेही समाजासाठी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.