पवार कुटुंबाची उद्या बारामतीत बैठक; पार्थ यांच्या निर्णयाकडे लक्ष

शेअर करा !

पुणे प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे उद्या आपल्या वडिलांसोबत बारामती येथे सल्ला मसलत करणार असल्याची माहिती समोर आली असून आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही.

दरम्यान, पार्थ यांना जाहिररित्या शरद पवार फटकारल्यानंतर घडामोडी वेगवान झाल्याचे दिसून येत आहे. आज दुपारी पार्थ पवार पुण्याला रवाना झालेत.. पालकमंत्री या नात्याने अजित पवार उद्या पुण्यात झेंडावंदन करणार आहेत. त्यानंतर पार्थ आणि अजित पवार दोघंही बारामतीला रवाना होणार आहे. त्यानंतर पार्थ पवार यांच्याबाबत श्रीनिवास पवार यांच्या घरी बैठक होणार असल्याची माहिती आहे. येथे पार्थ हे नमती भूमिका घेणार की आक्रमक याबाबत आता औत्सुकाचे वातावरण निर्मित झाले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!