कोरोनावर विजय मिळवणार्‍यांचा संख्या चार लाखांच्या पार !

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बरे होणार्‍यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. या अनुषंगाने राज्यात या विषाणूवर मात करणार्‍यांची संख्या चार लाखांच्या पार गेल्याची माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज सायंकाळी राजेश टोपे यांनी कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आज घडीला ४ लाखांहून जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १२ हजार ६०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० हजार ४८४ रुग्ण मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या ५ लाख ७२ हजार ७३४ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख १ हजार ४४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५१ हजार ५५५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन १९ हजार ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

Protected Content