नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे खासदार वरूण गांधी यांच्याशी डिनरसह विस्तृत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार वरूण गांधी हे भाजपच्या नेतृत्वावर नाराजा असल्याचे कुणापासून लपून राहिलेले नाही. त्यांनी शेतकरी आंदोलन, महागाई आदी मुद्यांवरून भाजपवर टिका केली आहे. यातच आता त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
डिनर डिप्लोमसीमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले, तरी संभाव्य राजकीय प्रवासावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे वरूण गांधी भाजप खासदार असूनही त्यांनी अनेक मुद्यावर मोदी सरकारला घेरताना कठोर शब्दात टीका केली आहे. त्यामुळे ते भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत का ? याची चर्चा सुरु झाली आहे.