जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील आर.आर. शाळेजवळ ताहेर ट्रान्सपोर्ट परिसरात मध्यरात्री निंबाचे एक विशाल आणि जुने झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने ही घटना रात्री उशिरा घडल्याने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. सकाळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास आर.आर. शाळेजवळील ताहेर ट्रान्सपोर्ट परिसरात असलेले जुने निंबाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. झाडाचा आकार मोठा असल्यामुळे संपूर्ण रस्ता अडविला गेला होता. मात्र, त्या वेळी परिसरात वाहतूक कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. सकाळी स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि महापालिकेचे पर्यावरण अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करत झाडाचे तुकडे करून ते रस्त्याच्या बाजूला हटविले.

झाड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांनीही अग्निशमन विभागाच्या तत्पर कार्याचे कौतुक केले. या बचाव आणि मदत कार्यात वाहनचालक मयूर ओतारी तसेच फायरमन संजय तायडे, किरण पाटील आणि रुपेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत झाड हटविण्याचे काम वेगाने पूर्ण केले. प्रशासनाच्या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला असून, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.



