Home Cities एरंडोल गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जाच्या मागणीसाठी एरंडोलात भव्य मोर्चा

गौमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जाच्या मागणीसाठी एरंडोलात भव्य मोर्चा


एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशी गौमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्यावा, गोहत्या बंदीसाठी केंद्रीय कायदा करावा आणि गौसेवा-सुरक्षेला कायदेशीर संरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी एरंडोल येथे गौ सन्मान अभियानांतर्गत भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विविध हिंदुत्ववादी संघटना, गौप्रेमी, गौसेवक, गौपालक तसेच वारकरी संप्रदायातील शेकडो भाविकांच्या सहभागामुळे हा मोर्चा शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

भगवा चौकातून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. बालगोपालांनी वारकरी वेशभूषेत टाळ, मृदुंग, तंबोरा यांच्या गजरात ‘रामकृष्ण हरी’च्या नामघोषात वातावरण भक्तिमय केले. गौमाता आणि नंदीदेव यांच्या प्रतिकात्मक उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात महिला, पुरुष, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. त्यानंतर मुख्य बाजारपेठ, मेनरोड, बुधवार दरवाजा, मारीमाता चौक, म्हसावद नाका मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला. या मार्गावर नागरिकांनी मोर्चाचे स्वागत केले. शिस्तबद्ध पद्धतीने आणि धार्मिक-सामाजिक वातावरणात निघालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले.

तहसीलदार गोपाळ पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात देशी गौमातेला राष्ट्रमाता म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशभर गोहत्या संपूर्ण बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा लागू करावा, गौसंवर्धनासाठी ठोस राष्ट्रीय धोरण राबवावे, गौशाळांना संरक्षण व सहाय्य द्यावे, तसेच गौमातेला सन्मान, सेवा आणि सुरक्षा यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

मोर्चात राजलक्ष्मी गौशाळेचे तथा नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, समर्पण गौशाळेचे रविंद्र पाटील, राजमाता जिजाऊ गौशाळेचे राजू पाटील, माजी नगरसेवक जगदीश ठाकुर, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, नगरसेविका छाया दाभाडे, कमल पाटील, शोभा साळी, आरती ठाकुर तसेच नगरसेवक अनिल महाजन, नितेश चौधरी, गोपाल पाटील, रश्मी दंडवते, प्रसाद दंडवते, माधव जगताप, गणेश वाणी, करण पाटील, महावीर भोई, जगदीश परदेशी, भैया चौधरी, बाळा काठेवाडी, भालचंद्र शिंपी, गोपाळदास पाटील, अजय निकम, मदन ठाकुर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेकडो महिला-पुरुष आणि वारकरी संप्रदायातील मंडळींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोर्चाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. गौसंरक्षणाचा मुद्दा केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेशी निगडित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, अनिल पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला.


Protected Content

Play sound