Home Cities एरंडोल एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन ट्रॅक्टर...

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, दोन ट्रॅक्टर जप्त


एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल आणि परिसरातून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला मोठे यश आले आहे. पथकाने अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवून दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांमधील तब्बल ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा (नाबालिग) समावेश आहे.

एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत गु.र.जि.क्र. ४४/२०२६ व गु.र.जि.क्र. ८४/२०२६ नुसार लागोपाठ ट्रॅक्टर चोरीचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. या घटनांमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांचे एक विशेष पथक तयार केले आणि संबंधितांना हे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे निर्देश दिले.

एलसीबीच्या या विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, सायबर सेलची मदत आणि गोपनीय माहितीच्या आधारे विखरण (ता. एरंडोल) येथील संशयित आरोपी विकी देवरे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. पथकाने त्यांची गुन्ह्यासंदर्भात कसून आणि कौशल्याने चौकशी केली असता, त्यांनी हे दोन्ही गुन्हे त्यांचे इतर साथीदार गणेश भिकन गोसावी व प्रविण भाईदास कोळी (दोन्ही रा. विखरण, ता. एरंडोल) यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात नमूद असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण ३,२५,००० रुपये किमतीचे चोरी गेलेले दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या टोळीतील उर्वरित दोन फरार आरोपींचा पोलीस पथकाद्वारे अत्यंत कसून शोध सुरू असून, त्यांनाही लवकरच गजाआड केले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एरंडोल परिसरातून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३.२५ लाखांचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राहुल गायकवाड, पीएसआय जितेंद्र वल्टे आणि हेकॉ संदीप पाटील, हेकॉ प्रवीण मांडोळे, हेकॉ हरीलाल पाटील, राहुल चौधरी, संदीप पाटील, नंदन पाटील, पीसी भूषण शेलार आणि चापोशी बाबासाहेब पाटील यांनी तपासात सहभाग घेतला.


Protected Content

Play sound