अरे बापरे…या डॉक्टरने केलेत १०० पेक्षा जास्त खून !

गुरूग्राम वृत्तसंस्था । डॉक्टरला देवदूत समजले जात असतांना एका डॉक्टरने तब्बल १०० पेक्षा जास्त खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याला आज पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुग्राम किडनी प्रकरणात सहभागी असलेल्या अलिगडमधील डॉ. देवेंद्र शर्मा यांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे. २००२, २००४ दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये त्याने शंभरहून अधिक टॅक्सी चालकांना ठार केले. हे सर्व मृतदेह तो अलीगड विभागातील कासगंज जिल्ह्यातील हजारा कालव्यात टाकत होता. सध्या ६२ वर्षे वय असणारा देवेंद्र शर्मा याने बिहारमधील सिवान येथून बीएएमएस (आयुर्वेद चिकित्सा व शस्त्रक्रिया पदवी) घेतली होती. यानंतर त्याने १९८४ नंतर ११ वर्षे जयपूरच्या बांदीकुई येथे जनता हॉस्पिटल व डायग्नोस्टिक्स या नावाने क्लिनिक चालविले. १९९४ मध्ये एका गॅस एजन्सीची डिलरशिप मिळवण्यासाठी शर्मानं ११ लाख रुपये खर्च केले. मात्र येथे फसवणूक झाल्याने त्याचे पैसे बुडाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी देवेंद्रनं १९९५ साली अलीगढमध्ये एक बोगस गॅस एजन्सी सुरू केली. त्याचवेळी तो उदयवीर, वेदवीर आणि राजच्या संपर्कात आला. चौघे मिळून गॅस सिलिंडरनं भरलेल्या ट्रकच्या चालकांच्या हत्या करायचे. त्यानंतर ते सिलिंडर आपापल्या गॅस एजन्सीमध्ये न्यायचे आणि मेरठला नेऊन ट्रकचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करायचे.

खून केलेल्या चालकांचे मृतदेह तो कासगंज येथील कालव्यात टाकत असे. येथे खूप मगरी असल्यामुळे कोणताही मृतदेह आढळून न आल्याने ही टोळी अनेक वर्षांपर्यंत बिनबोभाटपणे खून करत राहिली. दरम्यान, बोगस गॅस एजन्सी चालवत असल्याच्या आरोपाखाली देवेंद्रला अटक झाली. मात्र जामीन मिळाल्यानंतर तो अवैध किडनी प्रत्यारोपित करणार्‍या एका टोळीत सहभागी झाला. जयपूर, वल्लभगढ आणि गुरुग्राममध्ये त्यानं १२५ जणांच्या किडनी प्रत्यारोपित केल्या. येथे त्याने रग्गड पैसा कमविला.

२००४ साली गुरुग्रामच्या अनमोल नर्सिंग होमवर पोलिसांनी छापा टाकत त्याला अटक केली. यातल्या ७ प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली. तो जयपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगत होता. जानेवारीत त्याला २० दिवसांचा पॅरोल मिळाला. मात्र तो फरार झाला आणि दिल्लीत आला. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. अखेर आज त्याला अटक करण्यात आली आहे. आज पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने आपण फक्त ५० खूनांपर्यंतच आकडा मोजला असून नंतर गणना करून देण्याचे सोडून दिले होते अशी धक्कादायक कबुली दिली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार त्याने १०० पेक्षा जास्त खून केले आहेत. यामुळे आता गायब झालेल्या टॅक्सी चालकांच्या प्रकरणात त्याच्यावर नवीन गुन्हे दाखल करण्यात येतील अशी शक्यता आहे.

Protected Content