चिंताजनक : राममंदिराच्या भूमिपूजनाआधी मुख्य पुजाऱ्यासह १६ पोलिसांना कोरोनाची लागण !

अयोध्या (वृत्तसंस्था) राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या तयारीला वेग आलेला असतानाच मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रदीप दास हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार आहेत. मात्र याआधी एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुजारी प्रदीप दास यांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राम जन्मभूमीच्या सुरक्षा व्यवस्थेतील १६ पोलिस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या आधी पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी अयोध्येमध्ये करोनाचे ६६ नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत अयोध्येत ६०५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३७५ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अयोध्या जिल्ह्यात करोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content