नवी दिल्ली, वृत्तसंस्था | एटीएममध्ये स्कीमर, हँकिंग करून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी ‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने शिफारसी सुचवल्या आहेत. या शिफारसी लागू झाल्यास ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेळेची बंधने येणार आहेत. एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना ६ ते १२ तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे.
वर्ष २०१८-१९ मध्ये दिल्लीमध्ये १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, महाराष्ट्रात २३३ प्रकरणे उघडकीस आली होती. देशभरात एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या ९८० झाली होती. या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्लीत १८ बँकांच्या प्रतिनिधींसोबत ‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने चर्चा केली. या बैठकीत एटीएम मशीनद्वारे होणारी फसवणूक, लूट रोखण्यासाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये वेळेचे बंधन घालण्याचा मुद्दा समोर आला होता. एटीएमच्या दोन व्यवहारांमध्ये ६ ते १२ तासांचे अंतर ग्राहकांना ठेवावे लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
या कमिटीचे निमंत्रक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी आणि सीईओ मुकेश कुमार जैन यांनी सांगितले की, एटीएम मशीनद्वारे होणारी फसवणूक, लूट मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत करण्यात येते. त्यामुळे एटीएम व्यवहारावर बंधने घालण्याचा पर्याय समोर आला. त्याशिवाय या बैठकीत अनधिकृतपणे पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्यास ग्राहकांना ओटीपी पाठवून अलर्ट करावे, असा मुद्दाही समोर आला असल्याचे जैन यांनी सांगितले.