उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली सप्ताहाची सांगता

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री नथूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह आयोजित सामूहिक श्री विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सवाची आज सांगता झाली.

श्रीक्षेत्र फैजपूर येथे त्रैमासिक उत्सव सोहळा श्री नथूसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह आयोजित सामूहिक श्री विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सव दिनांक ९ जानेवारीपासून सुरू आहे. या आनंद उत्सवाचा समारोप काल्याच्या कीर्तनाच्या रूपातून ह. भ. प. श्री उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.

आता हेची जेवू, सवे घेवू शिदोरी
हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने
चवी चवी घेवू घास ब्रम्हरस आवडी
तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना

प्रस्तुत काल्याचा महिमा सांगणार्‍या अभंगातून झाली. काला म्हणजे प्रसाद. (पूर्णता) संसार करून पदरात पश्चाताप पडतो मात्र परमार्थाचा समारोप प्रसादात होत असतो. उत्तर भारतातील महात्म्यांनी रासलीलेला अत्यंतिक महत्त्व दिले असून दक्षिण भारतातल्या संतांनी काल्याला महत्त्व दिल आहे.
धाम अवतार, देव अवतार, नाम अवतार व लीला अवतार असे चार परम सत्यतत्वे आहेत. जीवन जगत असताना खरंतर आपला शत्रू कोण ? या प्रश्नाचे उत्तर – हरि कथे ते धिक्कारी
शत्रू माझा तोच वैरी
अशा अर्थाने दिला जातो. आपण हरिनाम चिंतनात इतके व्यस्त असावे की, अवगुण करण्याकरता आपल्याकडे वेळच असू नये. वैयक्तिक प्रार्थना व नामजप महत्त्वाची तर आहेच मात्र सामुदायिक प्रार्थना व नाम संकीर्तनाने पुण्य लाभ होतो आणि म्हणूनच ह. भ. प. उमेश महाराज दशरथे यांनी ,
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा… हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा संदेश दिला.
मनुष्याची इंद्रिये सुख-पिपासू असतात. विषयांचे सुख आपल्याला गोड वाटतं मात्र एवढा गोड नरदेह परमभाग्याने प्राप्त होत असतो. त्यामुळे नको त्या विषयामागे जाऊन वाटोळ करण्यापेक्षा नामजप करणे अधिक संयुक्तिक होईल. विषयाचे सुख येथे वाटे गोड
पुढे अवघड यमदंड
याअर्थी प्रत्येकाने आपापल्या जीवनात हा नियम पाडलाच पाहिजे. संतगण म्हणतात नामजपाची शिदोरी ही न संपणारी शिदोरी म्हणजेच जोडी ले हे, न सरे धन आणि जर सरलेच तर उपजोनिया पुढती येवू हेच करू.

नाम साधनेचा उद्देश देव असणं हे हरिनामाचे मिश्रण आहे. भगवंताचे नाम अत्यंत गोड, अनुकूल व आनंददायी असते. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या मते,
विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती
ज्ञानोबारायांच्या शब्दात
गोड तुझे नाव विठोबा आवडते मज
तर संत नामदेवराय म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून ह. भ. प. उमेश महाराज दशरथे यांनी बाल कृष्णाच्या विविध लीला उपस्थित भक्तगणांसमोर अत्यंत रसाळ, ओघवत्या वाणीतून व विनोदी शैलीत मांडली.

यशोदा माता तीच जीला दुसर्‍याला मोठेपणा देता येतो. आणि म्हणून मोठ्या माणसाचं लक्षण असतं ते श्रेय दुसर्‍याला देतात. संसारात कुठलीही गोष्ट सोशल्याशिवाय मिळत नाही. तर देव शरीराचे सौंदर्य पाहत नाही मनाचं सौंदर्य पाहतो. आणि म्हणूनच नामजपाने मनाचे सौंदर्य वाढवा असा उपदेश महाराजांनी केला.

यासोबत वारकरी सांप्रदायाला टिकवणे व वृद्धिंगत करण्यासाठी नामचिंतन आपल्या अंतिम श्वासापर्यंत टिकून ठेवण्याची अत्यंत गरज आहे आणि विशेष म्हणजे फैजपूर येथील महोत्सवाचे आयोजक व उपस्थित भक्तगणांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. विशेषतः महिला वर्गांचे कारण जरी त्यांच्या अंगावर दहा ते पंधरा हजाराची साडी नसली तरी काही हरकत नाही परंतु लाख मोलाची भगवतगीतेची वचनमुखावरती आहेत यापेक्षा श्रेष्ठत्व ते काय…! अशा शब्दात ह. भ. प. उमेश महाराज दशरथे यांनी धर्म मंडपातील पुरुष व महिलांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी महोत्सवाचे आयोजन समितीतील नरेंद्र नारखेडे यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहभागी असणार्‍या सर्वच घटकातील ज्येष्ठ, श्रेष्ठ मान्यवर कार्यकर्ते, भक्तगण यांचे आभार व्यक्त करीत नामजप व नामसंकीर्तन महोत्सवाचा यज्ञ यापुढेही असाच तेवत राहील असे आश्वासन देत, हेचि दान देगा देवा ही प्रार्थना भगवंत चरणी केली.

Protected Content