जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। जळगाव रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ८१ हजार ७२० रुपये किमतीचा ८ किलोपेक्षा जास्त गांजा मंगळवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास बेवारस स्थितीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आला. रेल्वे सुरक्षा बलाने हा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध मंगळवार, १६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता रेल्वे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार विनोद साळवे, डी.एच. खैरनार हे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना फलाट क्रमांक दोनवर एक ट्रॉली बॅग, लाल व पिवळ्या रंगाची कापडी पिशवी बेवारस स्थितीत आढळून आली. या विषयी तेथे असलेल्या प्रवाशांना त्यांनी विचारणा केली असता ते साहित्या आपले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी बॅग व पिशव्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात नेण्यात आले. या साहित्याच्या मालकाचा शोध घेण्यासाठी या अधिकाऱ्यांनी आजूबाजूला व रिक्षा थांब्याजवळ जावून पाहणी व चौकशी केली. मात्र कोणीही सापडले नाही. त्यामुळे या बॅग व पिशव्यांची तपासणी केली असता त्यात काही तरी अमली पदार्थ असल्याचे लक्षात आले. त्यावेळी आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, वैध मापन विभागाचे उपनियंत्रक बी.जी. जाधव, निरीक्षक चंद्रशेखर पालीवाल यांना कळवून त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यावेळी बॅग व पिशव्यांमध्ये गांजाचे ८१ हजार ७२० रुपये किमतीचे आठ किलोपेक्षा जास्त वजनाचे सहा पाकीट आढळून आले. या साठ्याचे नमुने घेऊन ते भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव व निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोउनि राजेंद्र पाटील करत आहेत.