विक्रीसाठी आणला गांजा : तरुणावर केली कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी|  शाहू नगरात विक्रीसाठी घरात साठवून ठेवलेला ८ हजार १०० रूपये किंमतीचा ३२४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केल्याची कारवाई शहर पोलिसांनी शुक्रवारी १ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता केली. याप्रकरणी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मजीद चांद शेख (४४, रा. इंदिरानगर, शाहूनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूनगर परिसरातील मजीद शेख याने घरात विक्रीसाठी गांजा ठेवला असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी १ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहूनगरात शेख याच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथे ८ हजार १०० रुपये किमतीचा ३२४ ग्रॅम वजनाचा अर्धवट ओला गांजा व बिया आढळून आल्या. या गांजासह वजनकाटा व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रात्री ११ वाजता पोहेकॉ विजय निकुंभ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मजीद चांद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि रवींद्र बागूल करीत आहेत.

Protected Content