मनीष जैन : तारा ते धुमकेतू

काही वर्षे जिल्ह्यातील राजकारणाचे ‘पोस्टर बॉय’ म्हणून अलोट लोकप्रियता संपादन करणारे माजी आमदार मनीष जैन यांचा आज वाढदिवस. जिल्ह्याच्या राजकीय क्षितीजावरील उदयमान झालेल्या तेजस्वी तार्‍यासोबत ज्यांची तुलना करण्यात आली ते मनीषदादा एखाद्या धुमकेतूप्रमाणे अकस्मात तेज दाखवून अंतर्धान पावले. वलयांकीत असतांनाचे वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात साजरे झालेला हा तरूण नेता आता राजकीय विजनवासात करतोय तरी काय? हा प्रश्‍न सर्वांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. याची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा पट उलगडून पहावा लागेल.

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात चित्तथरारक अध्याय सुरू झाला तो २०१०च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून ! खरं तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिल्हा नेता म्हणेल तेच होत असते. सुरेशदादांनी आपले समर्थक शरद वाणी यांना दोनदा विधानपरिषदेवर पाठवितांना आपणच जिल्ह्याचे ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले होते. २००४ च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत त्यांचे स्थान हे एकनाथराव खडसे यांनी हिसकावून घेऊन आपले समर्थक डॉ. गुरूमुख जगवाणी यांना निवडून आणत आपल्या वर्चस्वाची द्वाही फिरवली होती. याची परतफेड करण्यासाठी सुरेशदादा जैन यांनी पुढील म्हणजे २०१०च्या निवडणुकीत कंबर कसली. खरं तर विधानपरिषद उमेदवारीसाठी अनेक सक्षम पर्याय असतांना त्यांनी ईश्‍वरबाबूजी जैन यांचे पुत्र मनीष यांची केलेली निवड ही अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली. विशेष करून बाबूजी आणि दादा यांच्यात फारसे काही सख्य नसल्याचे ( किमान जगासमोर तरी ) चित्र असतांना ही बाब सनसनाटी ठरली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबूजी तेजाने तळपत होते. तर दुसरीकडे ज्या सुरेशदादांनी राष्ट्रवादीला सडवण्याची जाहीर प्रतिज्ञा घेतली तेच बाबूजींच्या चिरंजिवांचे राजकीय लाँचींग करत असल्याची बाब अनेकांसाठी ‘राजकीय केमीकल लोचा’ ठरली. या काळात बाबूजींनी ”मनीष हा आपला मुलगा असला तरी सुरेशदादांचे जास्त ऐकतो” असे अतिविनोदी वक्तव्य करून धमाल उडवून दिली. या पुढील तपशीलात जाण्याचे कारण नाही. तथापि, २०१०च्या विधानपरिषद निवडणुकीमुळे जळगाव जिल्हा राज्यभरात गाजला. यातील धनशक्तीचा वापर हा राज्यभरात चर्चीला गेला. काहींनी यातून आपले उखळ पांढरे करून घेतले. मात्र यातून सुरू झालेले राजकीय सूडचक्र आजही सुरूच असले तरी ज्यांच्यामुळे हे सूडचक्र सुरू झाले ते मनीष जैन राजकीय विजनवासात असल्याचा विरोधाभास आज पहायला मिळत आहे.

मनीष जैन यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत धमाकेदार विजय मिळवून राजकारणात एंट्री केली तरी ते मिरवण्याच्या पलीकडे फार काही करणार नसल्याची अटकळ बांधली जात होते. मात्र आपल्या आमदारकीला मिरवण्याऐवजी हा लक्ष्मीपुत्र अतीव राजकीय महत्वाकांक्षेने भारून जेव्हा मैदानात शड्डू ठोकून उतरला तेव्हा अनेकांना आश्‍चर्य वाटले. शेतकरी दौरे, मेळावे, रोजगार मेळावे, दिल्ली येथील दौरा तसेच अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचा धुरळा उडवून त्यांनी आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले. रूबाबदार व्यक्तीमत्वाला अस्खलीत मराठी, हिंदी व इंग्रजी वक्तृत्वाची जोड, स्वाभावातील गोडवा आणि अर्थातच लक्ष्मीमातेच्या कृपेमुळे मनीषदादा हे राजकीय क्षितीजावर उदयास आलेला चमकता तारा असल्याची भाकिते करण्यात आली. त्यांचे वडील हे जनतेशी फार जुडलेले नसल्याचे नेहमी आरोप केले जात असतांना मनीष जैन हे तरूणांच्या थेट खांद्यावर हात टाकून अथवा वयोवृध्दांच्या पायाशी झुकून आपलेसे करण्यात पारंगत असल्याचे जिल्हावासियांनी अनुभवले आहे. या दरम्यान, जिल्हा नेता होण्यासाठी त्यांनी पावलेदेखील टाकली. ‘जनक्रांती आघाडी’च्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्या समर्थकांचे नेटवर्क उभे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र याला फारच मर्यादीत स्वरूपात यश लाभले.

एकीकडे मनीष जैन यांची झंझावाती वाटचाल सुरू असतांना दुसरीकडे पडद्याआड राजकीय हिशेब चुकवण्याचा एक भयंकर ‘कार्यक्रम’ सुरू झाला होता. एकाच वेळी सर्वांना अंगावर घेतल्याने सुरेशदादा जैन यांना कारागृहात जावे लागले आणि, जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जणू काही भूकंपच झाला. या अघटिताला कुठे तरी २०१०च्या विधानसभा निवडणुकीची असलेली किनार ही कुणीही नाकारू शकत नाही. यानंतर मनीष जैन यांनी गिअर बदलून पहिल्यांदा काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर त्यांनी विधानपरिषदेचा राजीनामा देऊन थेट राष्ट्रवादीकडून विस्तृत मैदानात उडी घेतली तेव्हा पुन्हा खळबळ उडाली. आधीच्या निवडणुकीत खडसेपुत्राला पराजीत करणार्‍या मनीषदादांना मात्र त्यांच्या सुनेने धुळ चारून एक वर्तुळ पूर्ण केले. खरं तर एखादा जय अथवा पराजय हा कुणालाही राजकीय कारकिर्दीच्या रिंगणातून थेट बाहेर फेकू शकत नाही. यामुळे मनीष जैन हे यानंतरही राजकारणात सक्रीय राहतील असे मानले जात असतांना त्यांनी थेट विजनवासात जाण्याचा मार्ग पत्करल्याने सर्वांना बसलेला आश्‍चर्याचा धक्का हा अजून कायम आहे.

वर्तमानातील राजकीय स्थितीचा विचार केला असता, खुद्द ईश्‍वरबाबूजी हे राजकीय परिघावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच जामनेरच्या कार्यक्रमात त्यांनी ”आपण फक्त देण्यासाठी असून घेण्यासाठी नव्हे !” असे सूचक वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन हे आपले मानसपुत्र असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. तर अलीकडेच त्यांनी ‘आपला मुलगा व सून हे जामनेरचा विकास करत असल्याचे’ वक्तव्यदेखील केले आहे. अर्थात, बाबूजींनीही आता सक्रीय राजकारणातून बाजूला झाल्याची कबुली दिली आहे. तर मनीषदादाही अगदी शांतपणे बाजूला होऊन आपल्या व्यवसायावर लक्ष देत आहेत. अनेक राजकीय निरिक्षकांच्या मते राजकारणातील पद हे प्रत्येक राजकारण्यासाठी प्रगतीची संधी घेऊन येत असते. मात्र जैन पिता-पुत्र याला अपवाद ठरले आहेत. खासदार बनण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बाबूजींचे वजन हे सर्वांनी अनुभवले आहे. मात्र पद आल्यानंतरची स्थितीदेखील समोर आहेच. तर त्यांचे पुत्र मनीष जैन यांचे लाँचींग जोरदार झाले तरी अल्प काळातच पुढील पल्ला गाठण्याची केलेली घाई त्यांच्या अंगलट आली. आणि अर्थात एका उमद्या राजकीय नेतृत्वाला बाजूला व्हावे लागले.

आता सुरेशदादांनी मनीष जैन यांना आपला राजकीय वारसदार म्हणून का निवडले ? बाबूजींची याला मूकसंमती होती का ? दादांच्या कारावासामागील सूडचक्रात नेमका कुणाचा सहभाग आहे ? २०१४ नंतर जैन पिता-पुत्र हे आकस्मिकपणे राजकीयदृष्ट्या अक्रीय का बनले ? मनीष जैन यांनी विधानपरिषदेचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक कोणत्या समीकरणाच्या आधारावर लढविली ? यानंतर ते पुन्हा विधानपरिषदेच्या रिंगणात का उतरले नाहीत ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाबूजी जाहीरपणे आपल्या कधी काळच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचे तोंड भरून कौतुक का करत आहेत ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे सहजासहजी कुणालाही मिळू शकणार नाहीत. हे प्रश्‍न मनीषदादा जैन यांच्या आकस्मीक राजकीय एक्झीटप्रमाणेच अनाकलनीय आहेत. असो. आज वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय होण्याचा संकल्प करावा अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. कारण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याकडे अजून भरपूर वेळ आहे. मात्र हा निर्णय त्यांना स्वत:च घ्यावयाचा आहे.

:-शेखर पाटील

(मनीष जैन यांची राजकीय चुणूक दाखविणारे दोन व्हिडीओ आपण येथे पाहू शकतात. यातील पहिला व्हिडीओ हा १० मार्च २०११ रोजी शिरपूर येथील शेतकरी दौर्‍यात घेतला आहे.)

(तर दुसरा व्हिडीओ हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडातील ७ एप्रिल २०१४ रोजी घेतलेला आहे.)

Add Comment

Protected Content