


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाद्रपद शुद्ध दशमीनिमित्त सोमवार, २१ सप्टेंबर रोजी श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून सुरू झालेल्या ‘मंगल’ महाजागरामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विविध धार्मिक विधी, अभिषेक, ध्वजपूजन, महाआरती, ५६ भोग, पालखी मिरवणूक आणि महाधुपारती अशा विविध कार्यक्रमांनी जन्मोत्सवाला विशेष रंगत आली.
श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या सोहळ्याची सुरुवात पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर विशेष पंचामृत अभिषेकाने झाली. यानंतर सकाळी ६ वाजता दरवर्षीच्या परंपरेनुसार ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी परिवारासह वाद्यवृंदाच्या गजरात नवीन ध्वज मंदिरात आणले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आनंद महाले यांच्यासह सेवेकऱ्यांनी पांडव दाम्पत्याचे स्वागत केले. जिल्हाधिकारी घुगे यांच्या हस्ते ध्वजाचे तसेच ध्वजाचे मानकरी योगेश पांडव व त्यांच्या पत्नीचे औक्षण करण्यात आले. यावेळी संबळ वादन आणि भेरच्या निनादाने मंदिर परिसर मंगलमय झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर उपस्थित भाविकांनी सामूहिकरित्या देवांचा पाळणा म्हटला.
सकाळी ७ वाजता ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या कळसावरील तसेच मुख्य प्रवेशद्वारावरील जुने ध्वज उतरवून नवीन ध्वज लावण्यात आले. मंदिराच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या माजी सैनिकांनी नवीन ध्वजाला मानवंदना दिली. सकाळी ८ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाआरती झाली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता संभाजीनगर येथील उपाध्याय बंधू किशोर व श्रीकांत यांनी श्री मंगळग्रह देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांची उपस्थिती होती. जन्मोत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांनी श्री मंगळग्रह देवांचा पाळणा हलवत दर्शनाचा लाभ घेतला. पुण्यातील वेंकीज कंपनीतर्फे भाविकांना मोतीचूर लाडूंच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. हे प्रसादवाटप रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
यंदाच्या जन्मोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री मंगळग्रह देवांना अर्पण करण्यात आलेला ५६ विविध फळांचा नैवेद्य. अमळनेर येथील निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मीक पाटील यांनी देशी-विदेशी ५६ प्रकारच्या फळांचा भोग अर्पण केला. यात आंबा, पपई, जांभूळ, केळी, कलिंगड, बोर, सफरचंद, खरबूज, ग्रेपफ्रूट, संत्री, चिकू, म्हाळुंग, मोसंबी, अननस, लिंबू, द्राक्ष, नारळ, पेरू, सीताफळ, फणस, डाळिंब, रामफळ, हनुमानफळ, आवळा, पिस्ता, तुती, करवंद, अंजीर, प्लम, चिंच, खजूर, पीच, स्ट्रॉबेरी, जर्दाळू, ब्ल्यूबेरी, चेरी, रॅस्पबेरी, किवी, आक्रोड, ब्लॅकबेरी, ड्रॅगनफ्रूट, बदाम, क्रेनबेरी, पॅशनफ्रूट, एवोकॅडो, लिची, बेलफळ, स्टारफ्रूट, मंगोस्टीन, कवळ, उंबर आणि शेवगा आदी फळांचा समावेश होता. दरवर्षी विविध खाद्यपदार्थांचा ५६ भोग अर्पण करण्याची परंपरा असून यंदापासून त्यासोबत ५६ विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्याची नवीन परंपरा सुरू करण्यात आली.
मंदिराच्या ओट्यावर सजवण्यात आलेल्या पाळण्याभोवती देशी-विदेशी फुलांची आकर्षक मयूरपंखी सजावट करण्यात आली होती. ऑर्किड, सनफ्लॉवर, जर्बेरा, विविध प्रकारचे गुलाब, चायनीज गुलाब, शेवंती, निशिगंधा, जिप्सी, लिलियम, लिली, कॅला लिली, झेंडू, आस्टर, कामिनी, ट्युलिप, डॅफोडिल्स, अँथुरियम, चॉकलेट कॉसमॉस यांसह विविध फुले व पानांचा वापर या सजावटीत करण्यात आला होता. ही सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. श्री मंगळ जन्मोत्सवातील धार्मिक विधी जगभरातील भाविकांना पाहता यावेत, यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दिवसभरातील कार्यक्रमांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंगल तंत्रज्ञ आशिष चौधरी यांनी धार्मिक विधींचे लाइव्ह प्रसारण करून मंदिरात उपस्थित नसलेल्या भाविकांनाही या सोहळ्याशी जोडले.
दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी संबंधित समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले. या यागात विशेष मानकरी म्हणून आमदार चंद्रकांत सोनवणे व त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे, अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमाताई ढेकळे, बांधकाम व्यावसायिक प्रवीण नाना पाटील व त्यांच्या पत्नी कविताताई पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर व त्यांच्या पत्नी मंगलाताई बाविस्कर यांनी सहभाग घेतला. दुपारी साडेचार वाजेपर्यंत हा धार्मिक विधी सुरू होता. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदाच्या गजरात वाजतगाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची भव्य महाधुपारती करण्यात आली. या महाधुपारतीने दिवसभर सुरू असलेल्या ‘मंगल’ महाजागराची सांगता झाली.



