Home धर्म-समाज जे. ई. स्कूलमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ ; विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जे. ई. स्कूलमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ ; विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
5

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीचा सण पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार आयोजित या उपक्रमातून ध्वनी व वायुप्रदूषण टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या अतिवापरामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणात वाढ होते. याचा मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना फटाक्यांचा वापर टाळण्याचे, पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे तसेच आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी शाळेतील उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरणपूरक सण साजरे करावेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound