जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे व्याजाचे पैसे देणे घेण्यावरून एका व्यापाऱ्याला दोन जणांनी शिवीगाळ करून प्लास्टिकच्या नळीच्या पाईपने मारहाण करून दुखापत केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याची घटना बुधवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, महेश अशोक मराठे वय-४४, रा. शनिपेठ जळगाव हे बुधवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे असताना व्याजाचे पैसे देणे घेण्यावरून सागर सपके (पूर्ण नाव माहित नाही) रा. कोंबडी बाजार आणि राधेश्याम शर्मा रा. अयोध्या नगर जळगाव या दोघांनी मिळून शिवीगाळ करत प्लास्टिक नळीच्या पाईपने पाठीवर व हाता पायांवर मारहाण करून दुखापत केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या घटने संदर्भात महेश मराठे यांनी रात्री नऊ वाजता जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहे.