बॅंकेतील फलके मराठीत करा; मनसेची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३० मार्च रोजी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर पुन्हा एकदा भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही ही बाब प्रत्येक अस्थापनेत तपासून पाहा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले.

ज्यानंतर आता मनसैनिक कामाला लागले आहेत. ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली. यावेळी बँकेतील कार्यालयात कुठेच मराठीत व्यवहार आढळून येत नसल्याचे मनसेने निदर्शनास आणले. याबाबत एसबीआय बँकेतील बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन जाबही विचारला. बँकेत मराठी मातृभाषा लवकर बदला. आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार, असा इशारा मनसेकडून बँक मॅनेजरला देण्यात आला. तसेच बँकेतील इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक मनसे कार्यकर्त्यांनी उतरवले.

यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणे, अनिवार्य करावे, अशी मागणी मनसेने केली. मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेसह इतर पदाधिका-यांनी बँकेला निवेदन दिले. काही बँका बंद आहेत. उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खाजगी बँकांना निवेदन देणार आहे. मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार आहोत.

मराठी व्यवहार आणि बॅनर जर लावले नाही तर फुकट मार खाल. मराठी माणसाबाबत, मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील. पुढच्या ८ दिवसांत ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकांत आमचे निवेदन जाणार असून आम्हाला बदल दिसला पाहिजे, असा इशाराच अविनाश जाधव यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिला.

Protected Content