देहरादून-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तराखंडच्या सत्ताधारी भाजप सरकारने राज्यातील १५ ठिकाणांची नावं बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हरिद्वार, डेहराडून, नैनीताल आणि उधमसिंग नगर या चार जिल्ह्यांमधील काही ठिकाणांचे नावं बदलण्यात येणार आहेत. सोमवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली असून, लोकभावना, भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं उत्तराखंड सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, “या निर्णयामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान होईल आणि लोकांना प्रेरणा मिळेल.” याआधीच्या मुस्लिमध्वनी नावांना हटवून नव्या नावांमध्ये प्रामुख्याने हिंदू, मराठा आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
हरिद्वार जिल्हा
औरंगजेबपूर → शिवाजी नगर
गजिवली → आर्य नगर
चांदपूर → ज्योतिबा फुले नगर
मोहम्मदपूर जाट → मोहनपूर जाट
खानपूर कुर्सली → आंबेडकर नगर
इंद्रिशपूर → नंदपूर
खानपूर → श्रीकृष्णपूर
अकबरपूर फझलपूर → विजयनगर
डेहराडून जिल्हा
मियावाला → रामजी वाला
पिरवाला → केसरी नगर
चांदपूर खुर्द → पृथ्वीराज नगर
अब्दुल्ला नगर → दक्ष नगर
नैनीताल जिल्हा
नवाबी रोड → अटल मार्ग
पंचक्की-आयटीआय रस्ता → गुरु गोळवलकर मार्ग
उधमसिंग नगर जिल्हा
सुलतानपूर पत्ती → कौशल्या पुरी
या निर्णयावर भाजपने स्वागताचे सूर लावले आहेत. “हा निर्णय ऐतिहासिक असून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी मोलाचा टप्पा आहे,” असं भाजपचे माध्यम प्रमुख मानवीर चौहान यांनी सांगितलं. मात्र, विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने हा निर्णय “ध्रुवीकरणाचं राजकारण” असल्याचं म्हटलं आहे, तर काही राजकीय विश्लेषकांनी “वास्तविक विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष न देता नावांमध्ये बदल करून भावनिक राजकारण केलं जात आहे” असा आरोप केला आहे. उत्तराखंड सरकारने स्पष्ट केलं आहे की, नावं बदलण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये ही नवीन नावं अधिकृतपणे नोंदवली जातील. हा निर्णय लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवाद आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव निर्माण करतो की राजकीय रणनीतीचा भाग आहे, यावरून पुढील राजकीय हालचाली ठरतील.