
चोपडा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातून आणल्या जाणाऱ्या अवैध गांजाच्या वाहतुकीवर मोठा धडक दिला आहे. एका गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार जण ज्यात एक पुरुष व तीन महिला यांच्या ताब्यातून तब्बल १४ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा, ३ लाख १९ हजार ३९६ रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक हे करीत आहेत.
अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर आणि वरिष्ठ अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस सतत पेट्रोलिंग करत असतात. या मोहिमेदरम्यान मध्यप्रदेशातून अवैध गांजा, गावठी कट्टे, गुटखा यासारख्या मानवी आरोग्यास हानिकारक पदार्थांची खरेदी-विक्री व वाहतूक करणाऱ्या संशयितांविषयी माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी विशेष नेटवर्क तयार केले होते.
३० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस निरीक्षक महेश टाक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सत्रासेन ते लासूर या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. पोलीस पथकात पोहवा शशिकांत पारधी, रत्नमाला शिरसाठ, चेतन महाजन यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता संशयित चार जणांना नाटेश्वर मंदिराजवळ थांबविण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांची तपासणी केल्यावर मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत जतिन बबन जावळे (२२, कांदिवली, मुंबई), संताबाई मनोहर गवारे (७०), शांताबाई पंडरी सुमरपल्ली (७२) आणि राधाबाई लक्ष्मणराव सोनवणे (७८, सर्व रा. भिमनगर, परभणी). या चौघांकडून मिळून १४ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा गांजा, एकूण किंमत ३ लाख १९ हजार ३९६ रुपये, तसेच तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम १०२० रुपये असा एकूण ३ लाख ३६ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या संशयितांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचे व संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेचे उदाहरण ठरली आहे.



