Home क्रीडा जळगावात ५२ वी राज्य ज्युनिअर ज्युडो स्पर्धा २०२५ ची रंगतदार सुरुवात

जळगावात ५२ वी राज्य ज्युनिअर ज्युडो स्पर्धा २०२५ ची रंगतदार सुरुवात

0
123

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या इंडोअर हॉलमध्ये आजपासून ५२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर ज्युडो स्पर्धा व राष्ट्रीय निवड स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. जळगावच्या क्रीडा इतिहासातील ही एक भव्य आणि मानाची स्पर्धा ठरत असून, उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य ज्युडो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप तळवलकर, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. उमेश पाटील, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे आणि जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मान्यवरांनी तरुण खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश संपादन करण्यासाठी प्रेरणा दिली. खेळातील शिस्त, जिद्द आणि सातत्य या गुणांमुळे महाराष्ट्रातील ज्युडो खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रतिभावान खेळाडू सहभागी झाले असून, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे येणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. राज्यातील युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे कौशल्य आणि आत्मविश्वास सिद्ध करण्याची एक मोठी संधी ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा स्तरावरील राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ज्युडो संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीने उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन करून स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची उपस्थिती आणि खेळाडूंचा उत्साह यामुळे क्रीडांगण रंगतदार बनले आहे.


Protected Content

Play sound