Home आरोग्य जळगावच्या महादेव हॉस्पिटलची मोठी कामगिरी! बालहृदयातील छिद्र डीव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानाने यशस्वी बंद

जळगावच्या महादेव हॉस्पिटलची मोठी कामगिरी! बालहृदयातील छिद्र डीव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानाने यशस्वी बंद

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जन्मजात हृदयदोष असलेल्या दोन बालकांवर जळगाव येथील महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. मुंबईतील नामांकित बालहृदयरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या चिरफाडविरहित उपचारामुळे बालकांना नवजीवन मिळाले असून, उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

महादेव हॉस्पिटलच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये ही प्रक्रिया पार पडली. जन्मजात हृदयातील छिद्र (ASD/PDA/VSD प्रकारातील योग्य रुग्णांसाठी) कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता रक्तवाहिनीद्वारे विशेष उपकरण (डिव्हाइस) बसवून बंद करण्यात आले. या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे बालकांना छाती उघडण्याची गरज भासत नाही तसेच रक्तस्राव कमी होऊन रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.

या संपूर्ण उपचार प्रक्रियेचे नेतृत्व महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील (DM कार्डिओलॉजी) यांनी केले. त्यांना मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलचे पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. भूषण चौहान आणि डॉ. धवल खडके यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कार्डिओलॉजी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. झीशान सय्यद यांनीही उपचार प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दिकी यांनी तांत्रिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.

याबाबत माहिती देताना डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मजात हृदयातील छिद्राची वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार झाल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डीव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानामुळे मोठ्या शस्त्रक्रियेचा धोका कमी होतो, रुग्णाची रिकव्हरी जलद होते आणि अल्पावधीत रुग्ण सामान्य जीवनाकडे परतू शकतो. महादेव हॉस्पिटलमध्ये झालेल्या या यशस्वी उपचारामुळे जळगाव तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी अशा अत्याधुनिक उपचारांसाठी रुग्णांना मुंबईसारख्या महानगरांमध्ये जावे लागत होते. मात्र आता जळगावमध्येच उच्च दर्जाची पेडियाट्रिक कार्डिओलॉजी सेवा उपलब्ध होत असल्याचे या यशस्वी प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे. महादेव हॉस्पिटलमधील या अत्याधुनिक उपचारामुळे जन्मजात हृदयदोष असलेल्या बालकांसाठी नवीन आशेचा किरण निर्माण झाला असून, वेळेवर निदान आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे अनेक बालकांना निरोगी आयुष्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


Protected Content

Play sound