पुन्हा सुरू होणार मका खरेदी ! ; खा. रक्षाताई खडसेंचे प्रयत्न

भुसावळ प्रतिनिधी । शासकीय मका खरेदी पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी खासदार रक्षाताई खडसे यांनी केली होती. त्यांनी या अनुषंगाने पाठपुरावा केल्याने मका खरेदी पुन्हा सुरू होणार आहे.

केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित शासकीय मका खरेदी केंद्र सुरु होती. परंतु केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे दि.१८/१२/२०२० रोजी आदेश काढण्यात आले. 

मुळात मक्याची जवळपास महिनाभराने उशीरा सुरु केलेली खरेदी, लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणी, पोर्टल-सर्व्हर डाउनने खरेदी केंद्रांकडून मिळत नसलेला प्रतिसाद यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मका शिल्लक आहे. अनेक शेतकरी खरेदी केंद्रे पुन्हा सुरु होण्याची वाट बघताहेत. काही शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्रांवर तर काहींचा घरात भिजत आहे. खुल्या बाजारात विक्री करावी तर हमीभावाच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये फटका बसत आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या व्यवस्थापनाबरोबर घरखर्चासाठी पैसा हवा आहे. धान्योत्पादनाबरोबर चारा तसेच पशू-पक्षी खाद्यात मक्याचा उपयोग होतो. मक्याचा उत्पादन खर्चही वाढलेला आहे. अशावेळी किमान हमीभावाचा आधार मिळावा, अशी मका उत्पादकांची अपेक्षा आहे.  त्यामुळे उद्दिष्ट, मुदतवाढ, प्रस्ताव यांत केंद्र-राज्य सरकारने न अडकता मका खरेदी सुरु ठेवायला हवी अशी मका उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडे मागणी केलेली होती. 

महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी मका खरेदी बाबत शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली असुन, त्यांच्या मक्याची शासनाकडून खरेदी झालेली नाही. याबाबत ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री  रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रव्यवहार केला आणि मा. मंत्रीमहोदय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारने शासकीय मका खरेदी मुदत वाढ मिळणे बाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला नाही असे कळाले होते. 

राज्य सरकारने गरज भासल्यास आणि तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आल्यास मका खरेदीसाठी आणखी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासन केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना दिलेले होते. 

म्हणून ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी होण्याबाबत शासकीय मका खरेदी केंद्राला मुदत वाढ मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार कडून तत्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंतीखासदार रक्षाताई खडसे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री .ना. छगन भुजबळ यांना 21 डिसेंबर 2020 रोजी पत्र लिहून केलेली होती. त्याअनुसार राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असता केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळून मका खरेदी पुढच्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.

 

 

 

 

 

 

Protected Content