आपला पक्ष कसा वाढेल यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावे : आ. सोनवणे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “सर्वांनी एकदिलाने आणि एका विचाराने महायुतीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या पक्षाचा झेंडा सातत्याने फडकत ठेवण्यासाठी संघटना मजबूत करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले. यावल खरेदी-विक्री संघाच्या आवारात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार सोनवणे यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी कर्जमाफी, तालुक्यातील विकासकामे आणि विरोधकांच्या अपप्रचाराविषयी भाष्य केले.

“१५०० रुपये दोन महिन्यांनी बहिणींच्या खात्यात जमा होतात, मात्र शेतकऱ्यांसाठी देखील विचार करण्याची गरज आहे. चालू वर्षाचे ४५ हजार कोटींचे बजेट हे अपूर्ण आहे, मात्र आगामी काळात आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करू,” असे आमदार सोनवणे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “तालुक्यात अपप्रचार करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, आमचे गाव आहे, शेती आहे. आम्ही खोटे बोलत नाही आणि चुकीचे काही करत नाही. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना घाबरू नये, आपण पक्षाच्या मजबुतीसाठी कार्यरत राहावे.”

आमदार लता सोनवणे यांच्या कार्यकाळात २५०० कोटींची विकासकामे मंजूर झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “अजून १०० ते १५० विकासकामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. विकासकामांचा सुकाळ होईल आणि यासाठी प्रत्येक गावातील समस्या जाणून त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

महायुतीच्या पदाधिकारी नियुक्तीसाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करत आमदार सोनवणे म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या पाडर धरणासाठी वर्गणी मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.” बैठकीस उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून त्यांनी “संघटना वाढवण्यासाठी आणि महायुती मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट केले.

Protected Content