महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली- महायुतीचे जोरदार प्रत्युत्तर !

चाळीसगाव प्रतिनिधी । शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे नमूद करत भाजपसह मित्रपक्षांच्या महायुतीने या प्रकरणावर आपले प्रत्युत्तर दिले आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. आज महाविकास आघाडीने चाळीसगाव येथे जोरदार निदेर्शने करून आमदारांचा निषेध केला. तर याच प्रमाणे जळगावातही आंदोलन करण्यात आले. या पार्श्‍वभूमिवर, भाजप, रिपाइं (आठवले गट) आणि मित्रपक्षांच्या महायुतीने एका निवेदनाच्या माध्यमातून या प्रकरणाबाबत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आमदार मंगेश चव्हाण यांनी जनतेच्या समस्या सरकार व मुख्यमंत्री यांच्याकडून सोडविल्या जात नाहीत म्हणून उद्विग्नपणे बोललेल्या रिकामचोट या साध्या सरळ शब्दाचा बाऊ करून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी चाळीसगाव येथे आंदोलन करण्याचा पोरकटपणा केला. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे शिवसेनेत अडगळीत पडलेले असून ते इतके रिकामचोट आहेत की त्यांना रक्षाबंधनाच्या सणासुदीच्या दिवशी चाळीसगाव येथे येऊन आंदोलन करावे लागले. एकीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर राज्यांचे मुख्यमंत्री हे कोरोना निवारणासाठी राज्यभर फिरत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार घरात बसून असल्याचा हास्यास्पद विनोदी दावा त्यांनी केला.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना सारख्या संकटाच्या काळात महाविकास आघाडीचे नेते घरात बसलेले असताना प्रसंगी आमदार चव्हाण यांनी पदरमोड करून नागरिकांची सेवा केली. नवखे असले तरी २४ तास फिल्डवर काम करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. ते चाळीसगाव तालुक्यातील ५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. शेतकरी व जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांवर महाविकास आघाडी शासन व मुख्यमंत्री लक्ष देत नसल्याने त्यांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे काढून शेतकरी – कष्टकरी यांचे प्रश्‍न मांडले. कापूस प्रश्‍नी त्यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन कापूस खरेदी न झालेल्या नोंदणीकृत शेतकर्‍यांना २ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यामार्फत मका व हरभरा खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र त्यावर आजतागायत कारवाई नाही, फक्त दोन गोणी युरीयासाठी शेतकर्‍यांना दिवसभर पावसात उभे राहावे लागत आहे. आमदार यांनी पाठपुरावा करून व खासदार यांनी मंत्रालयाच्या पायरीवर बसून उपोषणाचा इशारा देऊनही चाळीसगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी वर्षभरात मिळत नाही. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची रिक्त पदे भरण्यात यावीत व कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी यासाठी मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी पत्र लिहून ते देखील मिळत नाहीत. एकीकडे लॉकडाऊन मुळे लाखो नागरिकांना रोजगार नसताना हजारोंची वाढीव वीजबिले पाठवून नागरिकांच्या जखमेवर मीठ महाविकास आघाडी चोळत आहे तर परत परत कडक लॉकडाऊन लावून व्यापारी वर्गाला वेठीला धरलं जात आहे.

यात पुढे म्हटले आहे की, अशी सर्व विदारक परिस्थिती असताना पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार चव्हाण उद्विग्न होऊन म्हणाले की, राज्यासमोर इतके सारे प्रश्‍न आ वासून उभे असताना मुख्यमंत्री यांनी त्यात लक्ष घालून ते प्रश्‍न सोडविले पाहिजेत, जिल्ह्या – जिल्ह्यात जाऊन नागरिकांना आधार दिला पाहिजे. मात्र मुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना भेटत नाही तिथे विरोधात असलेल्या आमदारांनी मांडलेले जनतेचे प्रश्‍न ते कुठे पाहणार. मात्र याकडे लक्ष व वेळ न देता मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तासनतास प्रवास करतात, स्वतःच्याच वृत्तपत्राला पांचट निरर्थक व विनोदी मुलाखती देतात अशी टीका त्यांनी केली त्यात त्यांचे काय चुकले.

रिकामचोट म्हणजे ज्याच्याकडे खूप वेळ आहे असा. राज्यात कारोना या साथीच्या आजाराचीची गंभीर परिस्थिती असताना.. शेतकरी व्यापारी उद्योजक एकूणच सर्वसामान्य जनता हवालदिल आहे.माननीय मुख्यमंत्री मंत्रालयात पाय ठेवत नाहीत… व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ने राज्य चालवायला राज्य हे काय आयटी कंपनी आहे का? रिकामचोट हा असंसदीय किवा शिवराळ शब्द नाही. खानदेशातील बोलीभाषेत हा शब्द बोलण्याच्या ओघात कायमच सहजगत्या वापरला जातो त्यात एवढं बाऊ करण्याचे कारण काय? असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे. राहिला आमदार चव्हाण यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचा विषय तर संपूर्ण राज्यात भाजपा – शिवसेना युती करून लढली. भाजपा – रिपाई – रासप – रयत क्रांती संघटना सोबत नसती तर ५६ सुद्धा आमदार राज्यभरात निवडून तरी आले असते का हा प्रश्‍न त्यांनी स्वतःला विचारावा आपल्या सर्व आमदारांना राजीनामा देण्याचे सांगून पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले आहे.

या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम व शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील; रिपाइं आठवले गटाचे लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद खरात, रासपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, रयत क्रांती संघटनेचे पप्पू दादा पाटील आदी पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content