Home उद्योग सोलर ग्राहकांच्या वाढीव वीजबिलांवर महावितरणची दखल ; खामगावात स्वतंत्र ‘तक्रार कक्ष’

सोलर ग्राहकांच्या वाढीव वीजबिलांवर महावितरणची दखल ; खामगावात स्वतंत्र ‘तक्रार कक्ष’

0
12

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सोलर पॅनल बसविल्यानंतरही वाढीव आणि अतिरिक्त वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खामगाव येथील महावितरण कार्यालयात सोलर ग्राहकांच्या समस्यांच्या निवारणासाठी स्वतंत्र ‘तक्रार कक्ष’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २५ जुलैपर्यंत लेखी तक्रारी सादर करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हा सचिव संजय शिनगारे यांनी केले आहे.

खामगाव येथील महावितरण कार्यालयात संजय शिनगारे यांनी स्थानिक नागरिकांसह भेट देऊन सोलर ग्राहकांना येणाऱ्या वाढीव वीजबिलांच्या समस्येबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. अनेक ग्राहकांप्रमाणेच स्वतः शिनगारे यांनाही घरावर सोलर प्रणाली बसविल्यानंतर अतिरिक्त वीजबिल आल्याने त्यांनी हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करत महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देशपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खामगाव शहर व मतदारसंघातील सोलर ग्राहकांच्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेऊन महावितरण कार्यालयात स्वतंत्र तक्रार कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून सोलर ग्राहकांच्या समस्या नोंदवून त्यांचे तांत्रिक परीक्षण करण्यात येणार आहे.

संजय शिनगारे यांनी खामगाव परिसरातील सर्व सोलर ग्राहकांना आवाहन करत म्हटले आहे की, ज्या ग्राहकांना सोलर यंत्रणा बसवल्यानंतरही वाढीव किंवा अतिरिक्त वीजबिले येत आहेत, त्यांनी आपल्या तक्रारी आवश्यक तपशीलासह लेखी स्वरूपात २५ जुलैपर्यंत महावितरण कार्यालयात जमा कराव्यात. तसेच संबंधित तक्रारीची छायांकित प्रत त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२२१२८५०३ वरही पाठवावी.नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचे सखोल परीक्षण करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि विद्युत क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्रत्येक तक्रारीची नियमानुसार तपासणी करून तांत्रिक त्रुटी अथवा अन्य कारणांमुळे ग्राहकांवर अन्याय झाला असल्यास त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही संजय शिनगारे यांनी दिली.


Protected Content

Play sound