Home आरोग्य संशोधन क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाची चमक; डॉ. गुड्डेटी यांना पीएच.डी.

संशोधन क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाची चमक; डॉ. गुड्डेटी यांना पीएच.डी.

0
41

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर येथून मेडिकल मायक्रोबायोलॉजी विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांनी पीएच.डी.चा व्हायवा-व्होसे यशस्वीरीत्या पूर्ण करत मेडिकल मायक्रोबायोलॉजी या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी एम.एस्सी.ची पदवी प्राप्त केली असून संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे संशोधन डॉ. हर्षदा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

त्यांच्या संशोधनाचा विषय “मध्य भारतातील एका तृतीय-स्तरीय रुग्णालयातील ‘अ‍ॅसिनेटोबॅक्टर बॉमॅनी’च्या क्लिनिकल आयसोलेट्समधील कार्बापेनेम प्रतिरोध आणि बायोफिल्म निर्मितीचे फेनोटिपिक व जीनोटिपिक गुणधर्मांकन” असा होता. संसर्गजन्य आजारांवर प्रभावी उपचार, प्रतिजैविकांचा (Antibiotics) योग्य वापर, औषध प्रतिकारशक्तीचा अभ्यास तसेच रुग्णांच्या उपचारपद्धती अधिक परिणामकारक करण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

या संशोधन प्रक्रियेदरम्यान एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर येथील मायक्रोबायोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुकेश बन्सल यांनी बाह्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. संशोधनाच्या गुणवत्तेची पडताळणी करून त्यांनी प्रबंधास मान्यता दिली.

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक, सहकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत आणखी भर पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound