


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या १४ ऑगस्ट २०२६ च्या निर्णयानुसार राज्यभरात “महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबवले जात असून, अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत येत्या १७ सप्टेंबर २०२६ आणि ६ जानेवारी २०२७ रोजी दोन्ही तालुक्यांतील पक्षकारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली महसुली दावे आणि अपिले तडजोडीने व परस्पर संमतीने निकाली काढणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमळनेर व चोपडा तालुक्यातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा व अपिलांचा यात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणांचा कायमस्वरूपी निपटारा करून नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे आणि प्रशासनावरील कामाचा ताण कमी करणे हा यामागचा मूळ हेतू आहे.
ज्या नागरिकांचे किंवा पक्षकारांचे महसुली दावे प्रलंबित आहेत, त्यांनी अथवा त्यांच्या वकिलांमार्फत शासन निर्णयातील “प्रपत्र-अ” मधील विहीत नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज संबंधित अर्धन्यायिक न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे. लोक अदालतीच्या निश्चित केलेल्या दिवशी दोन्ही बाजूंच्या संमतीने प्रकरणावर अंतिम आदेश पारित करून ते कायमस्वरूपी निकाली काढले जाईल. उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी अमळनेर व चोपडा तालुक्यातील सर्व नागरिकांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे १७ सप्टेंबर २०२६ व ६ जानेवारी २०२७ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून, सर्व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये यासंबंधीची प्रसिद्धी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



