जळगाव प्रतिनिधी । शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात लोकसंघर्ष मोर्चा उलगुलान आंदोलन पुकारणार आहे. यात ९ ऑगस्ट रोजी निदर्शने करण्यात येणार असून १० रोजी तहसीलदारांना निवेदने देण्यात येणार आहेत.
लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून या आंदोलनाची माहिती दिली आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती अर्थात राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ ऑगस्ट रोजी शेतकर्यांवर सातत्याने होणार्या अन्यायाच्या विरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणार्या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून ही निदर्शने करण्यात येणार आहेत. तर पंतप्रधान यांना आपल्या ९ मागण्यांचे पत्र पाठवले जाईल. १० ऑगस्ट रोजी स्थानिक ठिकाणी तहसीदारांना निवेदन देणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव येथे निदर्शने केले जाणार आहे. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावर प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अशोक पवार, भरत बारेला, केशव वाघ आदींच्या स्वाक्षर्या आहेत.