पाचोरा प्रतिनिधी । लिव्हर फायब्रोस्कॅनसारख्या अद्ययावत चाचणीतून लिव्हर विषयक बहुतांश विकारांचे निदान होत असून पाचोर्यातील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ही चाचणी उपलब्ध असल्याचे माहिती विख्यात डॉ. शरद देशमुख यांनी दिली. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
डॉ. शरद देशमुख एम.डी. (डी.एन.बी) हे पोटांचे विकार व लिव्हर तज्ज्ञ असून ते मूळचे पाचोरा तालुक्यातील कुर्हाड येथील रहिवासी आहेत. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. ते नाशिक येथील विख्यात अपोलो हॉस्पीटलमध्ये तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून आता प्रत्येक महिन्याच्या दुसर्या मंगळवारी पाचोरा येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये रूग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत संवाद साधतांना डॉ. शरद देशमुख यांनी निरोगी यकृतासाठी आवश्यक त्या टिप्स देतांना याच्या विकारांबाबत सध्या उपलब्ध असणार्या अद्ययावत उपचार पध्दतीची माहिती दिली.
डॉ. शरद देशमुख म्हणाले की, सध्या जीवनातील वाढता ताण-तणाव आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे पोट आणि यकृताचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यात अॅसिडिटीपासून ते लिव्हर सिरॉसीस, अल्सर, वजन कमी होणे, कर्करोग, वारंवार जुलाब होणे, शौचातून रक्त जाणे आदी विकार वाढले आहेत. याच्या जोडीला स्वादुपिंडाचे आजार अर्थात पॅनक्रिटायटीसचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. या व्याधींचे निदान वेळेत झाल्यास रूग्ण यातून पूर्णपणे बरा होतो. यासाठी इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लिव्हर फायब्रोस्कॅन, मॅनोनेट्री या सर्व तपासण्या उपलब्ध आहेत. यासाठी आधी मुंबई, पुणे, नाशिक येथे रूग्णांना जावे लागत होते. तथापि, विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमुळे आता परिसरातील रूग्णांची गैरसोय कमी होणार असल्याचे माहिती डॉ. शरद देशमुख यांनी दिली.
पहा : विख्यात लिव्हर व पोटांच्या विकाराचे तज्ज्ञ डॉ. शरद देशमुख यांनी दिलेली बहुमोल माहिती.