देशभरात १५०० प्राणवायू प्रकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारने  पूर्वतयारी सुरू केली आहे. ‘पीएम केअर निधी’तून १५०० प्राणवायू प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे चार लाख खाटांसाठी प्राणवायूचा पुरवठा केला जाईल. 

 

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठकीत देशातील प्राणवायू प्रकल्पांचा आढावा घेतला.

 

केंद्र सरकारने प्रत्येक जिल्ह्याात कोरोनासंदर्भातील सोयीसुविधा पुरवण्यासाठी २३ हजार कोटींच्या मदतीची तरतूद केली आहे.  मदतीचा हा दुसरा टप्पा असून पहिल्या टप्प्यात १५ हजार कोटी देण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्याात किमान १० हजार लिटर प्राणवायू साठवण्याची क्षमता निर्माण केली जाणार असल्याची घोषणा नवनियुक्त आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केली होती. हे प्रकल्प राज्यांच्या सहकार्याने कार्यान्वित होतील.

 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही ‘पीएम केअर निधी’तून उभे राहत असलेल्या प्राणवायू प्रकल्पांची शुक्रवारी तपशीलवार माहिती घेतली आणि हे प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची सूचना मोदींनी बैठकीत केली. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये प्राणवायू प्रकल्प नाहीत, पण ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध रुग्णालयांतील आठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. प्राणवायूच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला मोदींनी दिला. दुसऱ्या लाटेत प्राणवायूअभावी रुग्णांना जीव गमावावा लागला होता. सिंगापूरसारख्या देशातून प्राणवायू विलगीकरण यंत्रे आणि टँकर आयात करावे लागले होते. या समस्येवर मात करण्यासाठी प्राणवायू प्रकल्पांची निर्मिती केली जात असून या संदर्भात राज्यांकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.

 

 

काही दिवसांमध्ये लोक मुखपट्टी न घालता इकडेतिकडे फिरत असल्याच्या चित्रफिती पाहण्यात आल्या, हे चित्र फारसे चांगले नाही. अन्य देशांमध्ये पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशातही दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सध्या वेगाने लसीकरण केले जात आहे, नमुना चाचण्याही मोठ्या प्रमाणावर होत आहेत; पण एखादी चूकदेखील विपरीत परिणाम करू शकेल, असे मोदी बैठकीत म्हणाले.

 

दुसरी लाट ओसरू लागल्याने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये पर्यटकांनी गर्दी केली असून  नियमांचे उल्लंघन झालेले पाहायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखपट्टीचा वापर न करणे, अंतर नियम न पाळणे आदी प्रकार पुन्हा घडू लागले आहेत. लोकांना फिरायला जावेसे वाटणे साहजिक आहे, पण धोका टळलेला नाही. शिवाय, विषाणू उत्परिवर्तित होत आहे, ही बाब लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. दूरसंचार माध्यमातून नव्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मोदींनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी लोकांच्या निष्काळजीपणावर नापसंती व्यक्त केली. महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णांच्या मोठ्या संख्येबद्दलही चिंता व्यक्त केली.

 

देशात आतापर्यंत ३६.८९ कोटी लोकांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. १८ ते ४४ वयोगटातील ११.१८ कोटी लोकांना लस देण्यात आली

Protected Content