Home प्रशासन नगरपालिका भुसावळ नगरपरिषदेच्या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करा ; डॉ. नि. तु. पाटील यांची...

भुसावळ नगरपरिषदेच्या सभागृहाचे कामकाज लाईव्ह करा ; डॉ. नि. तु. पाटील यांची मागणी

0
6


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सुरू करण्याची मागणी भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना नगरपरिषदेच्या कामकाजाची थेट माहिती मिळण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

डॉ. नि. तु. पाटील यांनी भुसावळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताची संसद, तसेच राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करून लोकशाही प्रक्रिया अधिक खुली करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहातील कामकाज देखील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

भुसावळ नगरपरिषदेने सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्वसाधारण सभा, मासिक सभा तसेच इतर महत्त्वाच्या बैठकांचे थेट प्रक्षेपण नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास हा राज्यातील एक पथदर्शी निर्णय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात शहराच्या विकासासाठी कोणते प्रश्न मांडतात, विकासकामांवर कशी चर्चा होते, याची माहिती जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. थेट प्रक्षेपणामुळे नगरपरिषदेचा कारभार अधिक पारदर्शक होईल आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. शहराच्या अर्थसंकल्पावर, विकास योजनांवर आणि जनतेच्या पैशांच्या योग्य वापरावर कोणते नगरसेवक प्रभावीपणे भूमिका मांडतात, हे देखील नागरिकांना थेट पाहता येणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये अनेकदा वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, गोंधळ आणि अनावश्यक वादामुळे मुख्य विकासाचे विषय बाजूला पडतात. मात्र सभागृहातील प्रत्येक हालचाल नागरिक पाहत असल्याची जाणीव असल्यास लोकप्रतिनिधी अधिक जबाबदारीने आणि शिस्तीने काम करतील. त्यामुळे चर्चेचा दर्जा वाढून केवळ जनहिताच्या विषयांवर भर दिला जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही सुविधा सहज उपलब्ध होऊ शकते. नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर, युट्युब, फेसबुक किंवा अधिकृत ॲपच्या माध्यमातून कमी खर्चात सभांचे थेट प्रक्षेपण करता येऊ शकते. यामुळे भुसावळ नगरपरिषद ही आधुनिक आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारी स्मार्ट नगरपरिषद म्हणून ओळख निर्माण करू शकते.

भुसावळ शहराच्या विकासासाठी, प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देण्यासाठी नगरपरिषद सभागृहाच्या बैठकांचे लाईव्ह प्रक्षेपण करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. नि. तु. पाटील यांनी म्हटले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे निर्णय घेतल्यास भुसावळचा हा उपक्रम राज्यातील इतर नगरपरिषदांसाठी आदर्श ठरू शकतो, असेही त्यांनी निवेदनात सांगितले आहे.


Protected Content

Play sound