Home Cities जळगाव मनपा सभागृहाच्या अत्याधुनिक नूतनीकरणासाठी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे आयुक्तांना पत्र

मनपा सभागृहाच्या अत्याधुनिक नूतनीकरणासाठी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे आयुक्तांना पत्र

0
19


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहाचा आगामी २० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कायापालट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या नूतनीकरणासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, या कामाला तातडीने प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्याची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी २२ जून रोजी जळगाव मनपा आयुक्तांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात नमूद केले आहे की, महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहामध्ये मनपाची मुख्य महासभा, स्थायी समितीच्या सभा, विभागीय आढावा बैठका, तसेच मान्यवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विविध महत्त्वपूर्ण बैठका नियमितपणे आयोजित केल्या जातात. भविष्यातील वाढत्या प्रशासकीय गरजा आणि संभाव्य सदस्य संख्या लक्षात घेता, हे सभागृह अधिक सुसज्ज करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

या नूतनीकरणामध्ये सभागृहाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अत्यंत अत्याधुनिक स्वरूप देण्याचे नियोजित आहे. यामध्ये उच्च दर्जाचे इंटेरियर, संपूर्ण ध्वनिरोधक (साउंडप्रूफ) व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना, आकर्षक फॉल सिलिंग, डिजिटल डिस्प्ले प्रणाली, आणि अद्ययावत ऑडिओ-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधांचा समावेश असणार आहे. याशिवाय एलईडी स्क्रीन, सेंट्रल कंट्रोल सिस्टम, सदस्यांसाठी वाढीव व सुटसुटीत आसनव्यवस्था, उच्च दर्जाचे फर्निचर आणि संपूर्ण वातानुकूलित व्यवस्था करून सभागृहाच्या सौंदर्यात मोठी भर घातली जाईल.

या आधुनिक सुशोभीकरणामुळे महानगरपालिकेचे हे मुख्य सभागृह तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम, कार्यक्षम आणि प्रतिष्ठित स्वरूपाचे होईल. यामुळे मनपाच्या विविध महत्त्वपूर्ण बैठका व कार्यक्रमांचे आयोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. भविष्यातील आधुनिक प्रशासकीय कार्यपद्धती लक्षात घेता हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने, या कामासाठी आवश्यक ती प्रशासकीय व आर्थिक मान्यता प्रदान करून संबंधित विभागाला पुढील कार्यवाहीचे तात्काळ निर्देश द्यावेत, असे डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.


Protected Content

Play sound