यावल-भुसावळ मार्गावर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे जीवघेणे खड्डे!

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातून जाणाऱ्या भुसावळ मार्गावर फालकनगर बस थांब्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे खड्डे खोदलेले असून ते बुजवण्यात न आल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

फालकनगर बस थांब्याजवळ आयशानगर वस्तीच्या वळणावर रस्त्याच्या अगदी मध्यभागी नगर परिषदेने मागील तीन महिन्यांपासून दोन मोठे खड्डे खोदले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहनचालकांना अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. या धोकादायक खड्ड्यांमुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्याच्या मधोमध असलेल्या या खड्ड्यांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकजण आपले वाहने खड्ड्यात आदळण्यापासून वाचवताना गंभीर अपघातांना बळी पडू शकतात. पादचाऱ्यांसाठीही ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. यावल शहरातील नागरिक आणि वाहनधारकांनी नगर परिषद प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने हे धोकादायक खड्डे बुजवून प्रवाशांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नगर परिषदेने या गंभीर विषयाची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे, अन्यथा कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

Protected Content