मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस कोसळत असून, आज मुंबईसह पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील ब-याच भागांत धो-धो पाऊस बरसला. मुंबई शहर आणि उपनगरांत दाणादाण उडविली आहे. ढगांचा गडगडाट, विजांसह शहर आणि उपनगरांत दिवसभर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, रस्त्यांना थेट नदीचे स्वरूप आले. त्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, डोंबिवलीत वीज पडून २ ठार, तर मुंब्रा बायपास येथे दरड कोसळली. दरम्यान, राज्यातही सर्वत्र धो-धो पाऊस कोसळत असल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबईसह उपनगरांत आज कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा २० ते २५ मिनिटे विस्कळीत झाली तर पश्चिम मार्गावर जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावू लागली तर कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्याला नद्याचे स्वरूप आले. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. तसेच मध्य रेल्वे आणि पश्चिम मार्गावरही रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. पुण्यातही आजही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला.
राज्यातही सर्वत्र तुफान पाऊस पडत आहे. मराठवाड्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिवसह जालना, छ. संभाजीनगरमध्येही ब-याच भागांत तुफान पाऊस झाला. मागच्या तीन दिवसांपासून पावसाचा धडाका सुरू आहे. बीड जिल्ह्यात रविवारपासून रोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मंडळांत अतिवृष्टी झाली. आजही बीड, माजलगाव, गेवराई, केज तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील मांजरा धरणही भरले असून, या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. तसेच पिकेही पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे शेतपिकांची हानी झाली आहे.
विदर्भातही नागपूरसह विदर्भातील ब-याच भागाला पावसाने झोडपले. धुळ््यातही सर्वत्र पाऊस कोसळल्याने नदी, नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातही ब-याच भागांत पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यासोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राती तुफान पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र प्रकल्प तुडुंब भरले असून, शेतशिवारात पाणी साठले आहे. त्यामुळे पिकांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली.