Home Cities भुसावळ भुसावळच्या विकासासाठी वाद सोडून एकत्र या – उमेश नेमाडे  

भुसावळच्या विकासासाठी वाद सोडून एकत्र या – उमेश नेमाडे  


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी सर्व पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून विकासाभिमुख भूमिका स्वीकारावी, असे ठाम आवाहन केले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर प्रतिक्रिया देताना उमेश नेमाडे यांनी स्पष्ट केले की, हा विषय सध्या शासकीय पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय येण्यापूर्वी सार्वजनिक पातळीवर आरोप करणे योग्य नाही. अशा वादांमुळे शहरातील वातावरण दूषित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नेमाडे यांनी पुढे सांगितले की, भुसावळ शहरातील नागरिकांना सध्या पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांची गंभीर कमतरता भासत आहे. अनेक भागांमध्ये 10 ते 15 दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी ठोस नियोजन करून नियमित वेळापत्रक जाहीर करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शहरातील कचरा व्यवस्थापनाची स्थितीही चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही त्याचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप केला. कचराकुंड्यांमधील कचरा मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर पसरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा निष्काळजीपणाबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी प्रशासनावर नियंत्रण ठेवून आवश्यक ठिकाणी शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार वापरावेत, असेही नेमाडे यांनी स्पष्ट केले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

राजकीय संघर्ष थांबवून शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी दोन पावले मागे घेऊन एकत्र काम करावे, असे आवाहन करत नेमाडे यांनी संयुक्त विकास समिती स्थापन करण्याचीही सूचना केली. आमदार तथा मंत्री संजय सावकारे यांच्या माध्यमातून निधी मिळवून विकासकामांना गती द्यावी तसेच माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या सभांमध्ये मुद्देसूद चर्चा न होता गोंधळ निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे सांगत, गरज पडल्यास कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याचा सल्ला त्यांनी नगराध्यक्षांना दिला.


Protected Content

Play sound